राजगड कारखाना नव्याने उभारणार :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:15+5:302021-03-31T04:11:15+5:30
-- नसरापूर : राजगडच्या शेतकऱ्यांना उसाला जादा भाव मिळण्यासाठी उपपदार्थ निर्मिती करून राजगड कारखान्याची गाळप क्षमता १२५० टनांवरून ३५०० ...
--
नसरापूर : राजगडच्या शेतकऱ्यांना उसाला जादा भाव मिळण्यासाठी उपपदार्थ निर्मिती करून राजगड कारखान्याची गाळप क्षमता १२५० टनांवरून ३५०० टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच कारखान्याचे संपूर्ण आधुनिकीकरण करून नव्याने मशिनरीसह कारखाना उभारणार आहे, असे आश्वासन राजगड कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी दिले.
राजगड कारखान्याच्या ३० व्या वार्षिक ऑनलाइन सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पध्दतीने झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कारखान्याचे संस्थापक संचालक अनंतराव थोपटे, अध्यक्ष संग्राम थोपटे, उपाध्यक्ष विकासनाना कोंडे, पोपटराव सुके, के. डी. सोनवणे , कृष्णाजी शिनगारे , शोभा जाधव , सीमा सोनवणे , शंकरराव धाडवेपाटील , भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, जि.प. सदस्य दिनकरराव धरपाळे, संपतराव अंबवले, अरविंद सोंडकर, संदीप नगिणे, संदीप चक्के, ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलाणी आणि सर्व संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील महिंद उपस्थित होते.
३० व्या वार्षिक ऑनलाइन सर्वसाधारण सभेत ६६ सभासदांनी ऑनलाइन सहभाग घेतला. त्यामध्ये गणपतराव कंक, अशोक पांगारे, आबासाहेब यादव, बाळासाहेब गरुड, राजेंद्र नेवसे, उध्दव दिवेकर ,विठ्ठल खाटपे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी कारखाना जर नवीन क्षमतेने उभारला जाणार असेल त्यासाठी उसाची उपलब्धता कशी होणार, असा प्रश्न ऑनलाइन विचारण्यात आला. त्यावेळी थोपटे म्हणाले, नीरा देवधर धरणावरील वेनवडी उपसा सिंचन सह वेल्हा तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या पाणी योजनेला शासकीय पातळीवर मान्यता मिळाली असून गुंजवणी प्रकल्पाच्या ठरलेल्या सिंचनाबरोबर वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यात पाणी शेतीसाठी फिरवले जाणार आहे.त्यामुळेच ऊस उत्पादनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी कारखान्याने योजना तयार केली आहे.
यावर्षी राजगडने नवीनच इथेनॉल प्रकल्प सुरू करून उपपदार्थ निर्मितीबरोबर कारखान्याच्या बॉयलरसह संपूर्ण यंत्रणा नव्यानेच उभारून कारखाना नव्या क्षमतेने,नव्या यंत्रणेसह कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कारखान्याची ३५०० टन गाळप क्षमता वाढविण्याबरोबर ४५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प व १८ मेगावॉट क्षमतेचा को-जनरेशन प्रकल्प उभारणी केली जाणार आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी प्रास्तविक; तर राजू शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शैलेश सोनवणे यांनी आभार मानले.
--
फोटो नसरापूूर राजगड कारखाना सभा
सोबत फोटो - ऑनलाईन पध्दतीने राजगड साखर कारखान्याच्या ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना राजगडचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे , माजी मंत्री अंनतराव थोपटे.