सोनखतावरचा कांदाच निघाला सरस, कृषिशास्त्रज्ञांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 02:54 AM2018-05-06T02:54:30+5:302018-05-06T02:54:30+5:30

सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला, यात हे तथ्य समोर आले आहे.

Rajgurunagar agriculture News | सोनखतावरचा कांदाच निघाला सरस, कृषिशास्त्रज्ञांचा दावा

सोनखतावरचा कांदाच निघाला सरस, कृषिशास्त्रज्ञांचा दावा

googlenewsNext

राजगुरुनगर - सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला, यात हे तथ्य समोर आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकरी आयुष प्रसाद यांच्या कल्पकतेने आदिवासी, कृषी, ग्रामविकास विभागाने एकत्र येऊन देशात प्रथमच असा अभिनव प्रयोग केला. या कांदा पीक प्रात्यक्षिकाची माहिती संशोधन केंद्रात देण्यात आली.
याप्रसंगी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, युनिसेफ प्रतिनिधी तथा महाराष्ट्र पाणी व स्वच्छता विभागाचे राज्य सल्लागार डॉ. जयंत देशपांडे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, पुणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता समन्वयक उज्वला शिर्के,आदिवासी विभाग समन्यवक गणेश गावडे आदी उपस्थित होते.
कृषी शास्त्रज्ञ डॉ. ए. जे. गुप्ता, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. किरण भगत, डॉ. प्रांजली घोडके, डॉ. पी. एस. सौम्या, डॉ. थंगास्वामी, डॉ. करमय्या, डॉ. व्ही. कश्यप, श्रीराम बोंबले यांनी प्रयोगाअंती वरील दावा केला आहे. सोनखतामध्ये सेंद्रिय खत व गांडूळ खत यापेक्षा पिकांसाठी लागणारी नत्र, स्फुरद आणि पलाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याचेही यातून सिद्ध झाले आहे. सोनखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढतेच, या बरोबरच शेतकऱ्यांचा खर्चही कमी होऊन महिला बचत गट किंवा शेतकरी गटांना भविष्यात रोजगाराची संधीही उपलब्ध होईल.
कांदा संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग म्हणाले, की येथे उत्पादीत कांद्यावर शासन नियम अटीनुसार सर्व सोपस्कार करून चाचण्यांचा अहवाल केंद्राला सादर केला जाणार आहे. गुणवत्ता पूर्ण कांदा तयार झाल्याचा अहवाल प्राप्त होऊन निकषपूर्ण अहवाल मिळाला तर भविष्यात शेतकरी सोनखताकडे निश्चित वळतील, यात शंका नाही.
खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, की सोनखताचा प्रयोग यशस्वी झाला तर सर्व पिकांना फायदेशीर ठरण्याबरोबरच स्वस्त आणि मानवी आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे. कांदा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केलेला हा प्रयोग भविष्यात भारताला वरदान ठरणार आहे.

असा केला प्रयोग...

चांडोली येथील संशोधन केंद्रात सेंद्रीय खत, रासायनिक खते, सोनखत आणि सेंद्रिय व सोनखत असे ३ बाय २ चे चार वाफे तयार करण्यात आले. वेगवेगळ्या वाफ्यात कांदा पीक घेण्यात आले. यावेळी चारही वाफ्यात कांदा रोपे एकसारख्याच संख्येने लावण्यात आली. १४ दिवसांत कांदा काढणी करण्यात आली. त्यानंतर कांद्याची तीन विभागांत प्रतवारी करण्यात येऊन त्यांचे वजन करण्यात आले. यात सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे.

असे तयार होते सोनखत...
गोहे खुर्द (ता. आंबेगाव) येथून एका शौचालयाच्या शोषखड्ड्यातून हे सोनखत तयार केले. एका शोषखड्ड्यातून ८० ते ९० किलो सोनखत तयार होते. ते खत चहाची पत्ती उखळून झाल्यावर दिसते तसेच तयार होते. तसेच याचा कसलाही वास येत नाही. भविष्यात ग्रामीण भागातील एकूण शौचालयांचा विचार करता शेतीला सोनखत मिळण्यास मदत होईल, असे युनिसेफचे जयंत देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

आज स्वच्छ भारत अभियानातून शोष खड्डेयुक्त शौचालये उभी राहून त्या माध्यमातून ५ ते ७ वर्षांत खड्डे भरतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनखत तयार होईल. यापासून शेतीला आधार होऊन पीक उत्पादनात वाढ झाल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा, साठवणक्षमता यावर या ठिकाणीच संशोधन केले जाऊन याबाबतचा अहवाल महिनाभरात येणार आहे. त्यानंतर याबाबत सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.
- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी

Web Title: Rajgurunagar agriculture News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.