Pune: दारूला पैसे न दिल्याने आईला मारहाण करत भावाच्या छातीत खुपसला लोखंडी भाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:08 PM2021-11-20T12:08:12+5:302021-11-20T12:16:24+5:30
दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून आईला काठीने मारहाण करून लहान भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे...
राजगुरुनगर: दारुला पैसे दिले नाही याचा राग मनात धरून स्वतःच्या आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वृद्ध आईला काठीने का मारले असा जाब विचारला म्हणून मोठ्या भावाने लहाण भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसला आहे. या घटनेत प्रविण लक्ष्मण शिंदे (वय ४०, पापळवाडी चास, खेड ) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चास पापळवाडीत घडली आहे. आरोपी सुनिल लक्ष्मण शिंदे (रा. पापळवाडी चास) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी आरोपी सुनिल शिंदे वृद्ध आईकडे दारू पिण्यास पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडून सुनिल शिंदे यांने आईला शिवीगाळ करून हाता पायावर काठीने मारहाण केली. हा प्रकार भाऊ प्रविण शिंदे याला कळताच आरोपी सुनिल याला, तू आईला का मारहाण केली असा जाब विचारला असता राग मनात धरुन सुनिल याने घरात ठेवलेला साप मारण्याचा लोखंडी भाला आणून प्रविणवर प्रहार केला.
भाला धरण्याचा प्रविण याने प्रयत्न केला. मात्र भाला प्रविणच्या छातीला उजव्या बाजूस खोलवर लागून गंभीर जखम झाली आहे. दरम्यान वृद्ध आईला देखील ढकलून देऊन जमिनीवर पाडले. तेवढ्यात भांडणे सोडविण्याकरिता गावातील अक्षय अनिल शिंदे, दिपक यशवंत चव्हाण हे आले ते आल्यानंतर भाऊ सुनिल हा मोटार सायकलवरुन पळून गेला. पोलिसांनी आरोपी सुनिल शिंदे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. जखमी प्रविण यांच्यावर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार आर. एन. काबुगडे करीत आहे.