पुण्यात रिक्षा प्रवासादरम्यानही खरेदी करता येणार ‘राजहंसी’ पुस्तके
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:49 AM2021-02-26T11:49:07+5:302021-02-26T11:50:06+5:30
पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला जात आहे.
पुणे : शहरात रिक्षाने प्रवास करताना तुम्हाला पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळाली तर? राजहंस प्रकाशनाने ही संधी पुणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. ‘तीन चाकांवरील राजहंसी ज्ञानदूत’ या उपक्रमांतर्गत पुणेकरांना रिक्षाप्रवासादरम्यान पुस्तके खरेदी करता येणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आनंद हर्डीकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या योजनेचा प्रारंभ होणार आहे.
पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला जात आहे. याबाबत माहिती देताना ‘राजहंस प्रकाशन’चे शिरीष शेवाळकर म्हणाले, ‘सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शहरातील दहा रिक्षांमध्ये वाचकांना पुस्तके खरेदी करता येतील. कालांतराने रिक्षांची संख्या वाढवण्यात येईल.’
प्रवासादरम्यान वाचकांना निवडक १० पुस्तकांबाबतची माहिती सहज पाहता येईल, अशा तऱ्हेने रिक्षात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यानंतर ही पुस्तके खरेदी करायची असल्यास संबंधित रिक्षाचालकांकडून ती विकत घेता येणार आहेत. ‘राजहंस’च्या सर्व पुस्तकांची यादी सदर रिक्षामध्ये उपलब्ध असेल. या यादीतील कोणतेही पुस्तक हवे असल्यास त्याची मागणी वाचक रिक्षाचालकांकडे नोंदवू शकेल. त्यानंतर हे पुस्तक वाचकांना दिलेल्या पत्त्यावर घरपोच मिळेल. त्यामुळे वाचकांना पुस्तक खरेदीचा एक सोपा पर्याय यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.