राजीव गांधी देशातील संगणक क्रांतीचे जनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:12+5:302021-08-19T04:14:12+5:30
नेहरू-गांधी घराण्याचा उज्ज्वल वारसा लाभलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची शुक्रवारी (दि. २०) जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ...
नेहरू-गांधी घराण्याचा उज्ज्वल वारसा लाभलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची शुक्रवारी (दि. २०) जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी त्यांना केलेले अभिवादन.
--------
मुंबईत जन्मलेल्या राजीव गांधींना संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारणे आवश्यक बनले. १९८०-८१ च्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस याशिवाय सेवादल यांचे देशव्यापी संघटन आणि काँग्रेस पक्षाचे महासचिव या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. देशातील ते सर्वात तरुण पंतप्रधान होते. राजीवजींचे दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे मतदानाचे वय २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणणे आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण !
संगणक व दूरसंचार क्रांती हे राजीवजींचे फार मोठे योगदान आहे. देशात संगणक युग सुरू झाले. लाखो लोक बेकार होतील, असे सांगत भाजपने यास मोठा विरोध केला होता. आज मात्र संगणकाशिवाय जगणे अशक्य आहे, याची अनुभूती पदोपदी येते आणि त्यातून राजीवजींची थोरवीदेखील लक्षात येते. पूर्वी टेलिफोनचा प्रसार नव्हता. परगावी संपर्कासाठी ट्रंककॉल हाच पर्याय होता. आता मात्र प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. एका क्षणात जगात कोणाशीही आपण बोलू शकतो. ही दूरसंचार क्रांती राजीवजींमुळेच झाली तसेच या दूरसंचार क्रांतीमुळे कोट्यवधी नवीन रोजगार निर्माण झाले. तरुणांच्या हाताला काम मिळाले. आज १३५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात साठ कोटीहून अधिक इंटरनेट कनेक्शन्स आहेत, हे ट्रायच्या अहवालावरून दिसून येते. तसेच सुमारे शंभर कोटींच्या आसपास मोबाईल कनेक्शन्स आहेत. राजीवजींच्या धोरणामुळेच ही प्रगती आपण अनुभवत आहोत हे विसरून चालणार नाही.
राजीवजींनी देशातील राजकीय शैलीमध्ये शिस्त आणण्याचा प्रत्यत्न केला. ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीमुळे पक्षांतरे मोठ्या प्रमाणात व्हायची. सरकारे कोसळायची. हे थांबविण्यासाठी त्यांनी घटना दुरूस्ती करून पक्षांतरबंदी कायदा केला. महात्मा गांधींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामपंचायतीपर्यंत निर्णय प्रक्रियेत लोकांना सामावून घेण्यासाठी घटना दुरूस्ती करून त्यांनी ‘पंचायतराज विधेयक’ संसदेत मंजूर करून घेतले. पंजाबमधील शांततेसाठी त्यांनी केलेला ’राजीव - लोगोंवाल करार’ आणि आसाममध्ये निर्माण झालेली अशांतता दूर करण्यासाठी केलेला ’आसाम करार’ हे राजीवजींचे फार मोठे योगदान मानले जाते. भारतीयांची आस्था असणाऱ्या गंगेच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे साऱ्यांनी त्यांचे कौतुक केले, मात्र अशा भावनिक मुद्यांचा त्यांनी राजकारणासाठी कधी उपयोग केला नाही.
श्रीलंका आणि मालदीव येथे भारतीय शांतीसेना पाठविणे, पृथ्वी, अग्नी व त्रिशूल क्षेपणास्त्रांचा विकास करण्याची योजना राबविणे, लष्कराचे आधुनिकीकरण यातून भारतीय उपखंडात भारत प्रबळ लष्करी सत्ता म्हणून प्रस्थापित झाला. याचे सारे श्रेय राजीवजींनाच जाते. मुंबईत १९८५ मध्ये झालेल्या काँग्रेस शताब्दी अधिवेशनात ‘सत्तेच्या दलालांना दूर करा’ हे जाहीरपणे सांगून देशाच्या राजकीय संस्कृतीत फोफावलेल्या अनिष्ट पद्धतींवर आसूड ओढले. तसेच ‘शासकीय विकासकामातील एक रुपयातील जेमतेम १५ पैसेच प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचतात’ असे परखडपणे सांगून त्यांनी देशात फोफावलेल्या भ्रष्टाचार संस्कृतीवर अचूक बोट ठेवले. राजीव गांधींसारखा नेता गरीब, दलित, पददलित, मागासवर्गीय, आदिवासी, भटके विमुक्त अशा मोठ्या उपेक्षित समाजाचे आशास्थान बनले. लोकशाही, सर्वधर्मसमभाव, सामाजिक समता ही त्यांनी जपलेली मूल्ये अधिक बळकट करीत हा देश प्रगतिपथावर नेण्यासाठी झटणे हेच त्यांचे उचित स्मरण ठरेल.