...अखेर पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय खुले होणार; यंदा 'हे' नवे पाहुणे पाहायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:10 IST2022-03-15T16:10:02+5:302022-03-15T16:10:36+5:30
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय बंद होते; परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या २० मार्चपासून पुणेकरांसाठी ...

...अखेर पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय खुले होणार; यंदा 'हे' नवे पाहुणे पाहायला मिळणार
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय बंद होते; परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या २० मार्चपासून पुणेकरांसाठी ते खुले करण्यात येत आहे. प्राणिसंग्रहालयात आता आणखी तीन नवे पाहुणे जंगल कॅट, लेपर्ड कॅट व शेकरू पाहायला मिळणार आहे, तर तीन महिन्यांनंतर हायना (तरस) व चौशिंगाचेही दर्शन होणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्राणिसंग्रहालय कधी सुरू करणार, यासाठी विचारणा केली जात होती. अखेर २० मार्चला सुरू होत आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, अस्वल, हरीण, गवा, कोल्हा, लांडगा, आदी प्राणी पाहता येणार आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये नवीन प्राण्यांसाठी खंदक तयार केले आहेत. प्राणिसंग्रहालयात विविध विकासकामे झाली असून, अजून काही सुरू आहेत. कारण भविष्यात तरस, चौशिंगा, झेब्रा आणण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल.
डॉ. जाधव म्हणाले, ‘नव्याने काही प्रजातीचे प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतील. गेले दोन वर्षांपासून प्राणिसंग्रहालय बंद होते. खुले करण्याची खूप मागणी होत असल्याने २० मार्चपासून नागरिकांना पाहता येईल. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी यावे.’’
झेब्रा लवकरच येईल
प्राणिसंग्रहालयात झेब्रादेखील लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. त्यासाठी खंदकाची सोय केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बरीच विकासकामे झाली आहेत.
हे नवे प्राणी असणार
प्राणिसंग्रहालयात जंगल कॅट, लेपर्ड कॅट आणि राज्यप्राणी शेकरू हे नव्याने नागरिकांना पाहता येणार आहेत. त्यासाठी खंदक तयार केले आहेत.
प्राणिसंग्रहालय जागतिक दर्जाचे करण्यात येत असून, लवकरच तिकीट काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू होणार आहे. त्यासाठी निविदा काढली असून, अंमलबजावणीसाठी आणखी तीन-चार आठवडे जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांची तिकिटासाठी गर्दी होणार नाही असे डॉ. राजकुमार जाधव (संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय) यांनी सांगितले.