राजनाथ सिंह म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना बाॅम्बफेक बंद करायला लावली होती..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:06 PM2022-05-20T20:06:26+5:302022-05-20T20:10:30+5:30
"हम किसीको छोडेंगे नहीं...."
पुणे : आपण जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे विसरू नका, त्यामुळे समाजासाठी आपली जबाबदारी मोठी आहे, याची जाणीव ठेवा. आम्ही सरकार बनवण्यासाठी नाही तर देश बनवण्यासाठी राजकारण करतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभर महागाई वाढली आहे. कोरोना महामारीत देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिघडू दिली नाही. त्यामुळे जगात भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेपेक्षा भारतात कमी महागाई आहे, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यात केला.
पुणे शहरातील विश्रांतवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘पदाधिकारी संवाद’ कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी आमदार दिलीप कांबळे, बापूसाहेब पठारे, गणेश बिडकर, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
राजनाथ सिंह म्हणाले, की देशाची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामामुळे देशाचा विकास वेगाने होत आहे. प्रत्येक घरात स्वच्छतागृह देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आधीच्या सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र, आम्ही ते पार पाडत आहोत. आज केंद्र सरकार १०० रुपये देत असेल तर ते त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट मिळत आहे. पूर्वी त्या लाभार्थ्यांच्या पैशात भ्रष्टाचार व्हायचा. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार देशाला दिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना बाॅम्बफेक बंद करायला लावली
रशियाकडून युक्रेनवर बाॅम्बफेक सुरू होती. त्यावेळी युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी अडथळे येत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सांगून बाॅम्बफेक बंद करायला लावली. मोदी यांचे पुतीन यांनी ऐकले. ८ वर्षात अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रतिष्ठा वाढली आहे. पूर्वी आपले म्हणने कोणी ऐकत नव्हते, आता संपूर्ण जग गांभीर्याने ऐकत आहेत, असे ही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
हम किसीको छोडेंगे नहीं...
आज देश पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणताही देश भारताकडे वाकडे नजरेने बघत नाही. हम किसींको छोडेंगे नहीं, लेकीन कोही हमसे बिना बजाय लडेंगे, तो उन्हे हम छोडेंगे नहीं. तसेच भाजपच्या कार्यकर्त्याने कर्म करत राहावे. एक दिवस त्याची दखल घेतली जाते. जगात सगळं खोटं होऊ शकते, पण आपल्या संत, महात्माचे विचार कधीही खोटे होणार नाही.
ना हरकत दाखला मिळण्याची प्रक्रिया सुलभ करा
इमारतींच्या बांधकामाला लागणारा संरक्षण खात्याच्या ना हरकत दाखला मिळण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. जगदीश मुळीक यांनी संगमवाडी ते डेक्कन कॉलेज दरम्यान संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या रस्त्याने स्थानिक नागरिकांना वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी विनंती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.