राजू भालेकर स्मृती करंडक ६ फेब्रुवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:21 AM2021-02-05T05:21:33+5:302021-02-05T05:21:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित १९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित १९ वर्षांखालील गटाची क्रिकेट स्पर्धा येत्या ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदाच्या स्पर्धेत तीन नव्या संघांसह एकूण दहा संघ खेळणार आहेत.
पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, सचिव आनंद परांजपे, क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टसचे अनिल छाजेड, सचिन सुंदर यावेळी उपस्थित होते.
द्रविड यांनी सांगितले की, साखळी व बाद पद्धतीने होणारे सामने ४५ षटकांचे असतील. प्रत्येकी पाच संघांचे दोन गट असतील. साखळी सामन्यात प्रत्येक संघ प्रत्येकाशी एकदा खेळेल. दोन्ही गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेच्या उद्घाटनाचा व अंतिम सामना पीवायसी हिंदू जिमखान्याच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेतील दोन सामने दापोली येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टसच्या मैदानावर होतील.
भालेकर यांनी महाराष्ट्राच्या रणजी संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या स्मरणार्थ होणारी ही स्पर्धा क्रिकेट विश्वात प्रतिष्ठेची मानली जाते. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला निवड समितीचे सदस्य उपस्थित राहात असल्याने ही स्पर्धा महत्वाची मानली जाते. स्पर्धेच्या संयोजन समितीमध्ये विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, पराग शहाणे, इंद्रजीत कामतेकर, सारंग लागू, कपिल खरे यांचा सहभाग आहे.
चौकट
यांच्यात होणार झुंज
अ गट - पीवायसी हिंदू जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पूना क्लब, डेक्कन जिमखाना, २२ यार्ड्स.
ब गट - केडन्स, कंबाईन डिस्ट्रिक्ट्स , क्लब ऑफ महाराष्ट्र, युनायटेड स्पोर्ट्स, अँबिशियस क्रिकेट अकादमी.