Raju Shetty : आडवा येईल त्याला तुडवायचा, राजू शेट्टींनी सांगितली आगामी वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:47 PM2021-10-22T22:47:25+5:302021-10-22T22:47:59+5:30
पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषेदत राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या
पुणे - जो शेतकरीहिताच्या आडवा येईल, त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच, मी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज अन् भाजप सरकारवर खूश आहे, असं नाही, माझी वाटचाल शेतकऱ्यांच्या हितासाठीचीच असणार आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषेदत राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांची एफआरपीबाबत बैठक झाली. जयसिंगपूर येथे ता. १९ ऑक्टोबर रोजी ऊस परिषद झाली, त्यात काही ठराव झाले होते, त्याची प्रत आयुक्त गायकवाड यांना देण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाची एकरक्कमी एफआरपी दिली पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
राज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात तीन हजार तीनशे एवढी एफआरपीची रक्कम द्यावी आणि राहिलेली रक्कम जानेवारीपर्यत द्यावी. सध्या, ती तुकड्या तुकड्यात दिला जात आहे, शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांकडे ३२ महिने राहतात, त्याच्या व्याजाचं काय, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच, साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे झाल्याचेही म्हटले. दरम्यान, राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. उसतोडणी मजुरांच्या गोपीनाथ मुंडे महामंडळला केंद्र सरकारने मदत करावी. ऊसतोडणी मजुरांची नावनोंदणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.