राजू शेट्टी यांचं 'ते' वक्तव्य ब्राह्मण समाजाची बदनामी करणारं ; निवडणूक आयाेगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:12 PM2019-04-04T20:12:15+5:302019-04-04T20:15:09+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी काेल्हापूर येथील सभेत ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून राज्य निवडणूक आयाेगाकडे करण्यात आली आहे.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी काेल्हापूर येथील सभेत ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून राज्य निवडणूक आयाेगाकडे करण्यात आली आहे. तसा तक्रार अर्ज निवडणूक आयाेगाकडे दाखल करण्यात आला आहे.
राजू शेट्टी यांनी हातकणंगले येथे मंगळवारी केलेल्या भाषणात ब्राम्हण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे या अर्जात म्हंटले आहे. सीमेवर आमची पाेरं जातात. कुणा देशपांडे, कुलकर्णीची पाेरं सीमेवर जात नाहीत अशा पद्धतीने ब्राह्मण समाजाची विनाकारण बदनामी करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे. ब्राह्मण समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी लढत आला आहे. आजही समाजातील अनेक तरुण देशासाठी सैन्यात लढत आहेत. शहीद देखील झाले आहेत. असे असताना विनाकारण ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यासाठी शेट्टी यांनी हे वक्तव्य केले आहे. वास्तविक सीमेवार सैनिक जातीसाठी नाही तर देशासाठी जातात याचा शेट्टी यांना विसर पडला आहे, असेही या अर्जात म्हंटले आहे.
त्यामुळे या भाषणाचा व्हिडीओ यु ट्युबवर उपलब्ध असून ताे तपासून जातीयवादी वक्तव्याबद्दल, ब्राह्मण समजाता अपमान केल्याबद्दल राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.