राजू शेट्टी यांच्याकडून आचारसंहितेचा भंग?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 12:54 AM2019-04-06T00:54:27+5:302019-04-06T00:54:57+5:30
राजू शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यातील हेरले या ठिकाणी मंगळवारी केलेल्या भाषणात ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे या अर्जात म्हटले आहे.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील सभेत ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असून, त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसा तक्रार अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आला आहे.
राजू शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यातील हेरले या ठिकाणी मंगळवारी केलेल्या भाषणात ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे या अर्जात म्हटले आहे. ‘‘सीमेवर आमची पोरं जातात. कुणाल देशपांडे, कुलकर्णींची पोरं सीमेवर जात नाहीत,’’ अशा पद्धतीने ब्राह्मण समाजाची विनाकारण बदनामी करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे. ब्राह्मण समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी लढत आला आहे. आजही समाजातील अनेक तरुण देशासाठी सैन्यात लढत आहेत. शहीददेखील झाले आहेत, असे असताना विनाकारण ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यासाठी शेट्टी यांनी हे वक्तव्य केले आहे. वास्तविक सीमेवार सैनिक जातीसाठी नाही तर देशासाठी जातात याचा शेट्टी यांना विसर पडला आहे, असेही या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे या भाषणाचा व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध असून, तो तपासून जातीयवादी वक्तव्याबद्दल, ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेट्टी हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अशा प्रकारे जातीयवादी वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे. यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असून, त्यांचा अवमान केल्याबद्दल
त्यांच्यावर आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सेवा संघाचे अध्यक्ष अंकित काणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.