खडक पोलिसांनी जपली माणुसकी
By admin | Published: November 24, 2015 01:04 AM2015-11-24T01:04:29+5:302015-11-24T01:04:29+5:30
खाकी वर्दीमध्ये माणूसच काम करीत असतो; त्यालाही भावना आणि संवेदना असतात, याचा प्रत्यय खडक पोलिसांच्या उपक्रमामधून आला असून, खडक
पुणे : खाकी वर्दीमध्ये माणूसच काम करीत असतो; त्यालाही भावना आणि संवेदना असतात, याचा प्रत्यय खडक पोलिसांच्या उपक्रमामधून आला असून, खडक पोलिसांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी तब्बल १0 हजार किलो धान्याची मदत केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते हस्ते नारळ फोडून हा ट्रक मराठवाड्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. या कामामध्ये पोलिसांना सेवा मित्र मंडळाची मोठी मदत झाली.
खडक पोलीस ठाणे आणि सेवा मित्र मंडळाने गणेशोत्सवापासून आजवर दुष्काळग्रस्त भागासाठी तीन ट्रक धान्य पाठवले आहे. शनिवारी यातील तिसरा ट्रक अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे, उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव उपस्थित होते. सेवा मित्र मंडळासोबतच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश आणि नवरात्र मंडळांना एकत्र करण्यात आले. राज्यात पडलेल्या दुष्काळाचे आव्हान पेलण्यासाठी एकत्र येण्याच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला आवाहनाला मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. मंडळांनी देखावे आणि विसर्जन मिरवणुका रद्द केल्या, तसेच शाळकरी मुलांनी खाऊसाठीचे पैसे जमवून मदतीसाठी दिले.
यापूर्वी सोलापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव या भागात मदत पाठवण्यात आली होती. दुष्काळग्रस्तांची दिवाळी चांगली जावी, यासाठी दिवाळी सरंजामही पाठवण्यात आला होता. मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांना ४५0 दिवाळी किट भेट देण्यात आले होते. यामध्ये दिवाळीसाठी लागणारे ९ पदार्थ पुरेशा प्रमाणात देण्यात आले होते. यापुढेही दुष्काळग्रस्तांसाठी अशा प्रकारे मदत गोळा करण्यात येणार असून, इच्छुकांनी खडक पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी केले आहे.