राकेश रोशन यांची जमीन वादग्रस्त
By admin | Published: May 31, 2017 02:31 AM2017-05-31T02:31:23+5:302017-05-31T02:31:23+5:30
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांची खंडाळा राजमाची गार्डनसमोरील सुंदरभवन हॉलिडे होमची जागा वादाच्या भोवऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांची खंडाळा राजमाची गार्डनसमोरील सुंदरभवन हॉलिडे होमची जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महसूल विभागाच्या अधिका-यांनी जागेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून, बेकायदा उत्खननही थांबविण्यात आलेआहे.
लोणावळा नगर परिषदेकडून जागेचा ले आऊट मंजूर करताना सरकारी जागा व कब्रस्तानच्या जागेपैकी काही भाग हडप केल्याच्या आरोपांवरून मावळच्या महसूल विभागाने जागेचा सोमवारी पंचनामा केला. गौण खनिज उत्खननाची परवानगी न घेता सरकारी पड
जागेत उत्खनन केल्याप्रकरणी
कारवाई करत काम बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे लोणावळ्याचे मंडल अधिकारी बजीरंग मेकाले यांनी सांगितले.
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राजमाची गार्डन खंडाळा समोरील भूखंड दिग्दर्शक राकेश रोशन व अभिनेते हृतिक रोशन यांनी सुंदर भवन हॉलिडे होम नावाने खरेदी
केला आहे. तेथे नगर परिषदेमधून बांधकामाचा ले आऊट मंजूर
करत संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. ले आऊट मंजूर
करताना या भूखंडाच्या पोटभागात असलेला सर्व्हे नं. १८/१ अ ही सरकारी पड आकार ही ५१० चौरस मीटर जागा व सर्व्हे नं. १८/२ या कब्रस्थानच्या ७०४ मीटर जागेपैकी काही जागा हडप करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. किरण गायकवाड यांनी केला आहे. या बाबतची कागदपत्रे त्यांनी माहिती अधिकारात मिळविली आहेत. १९५३ सालापासून सातबारा उतारा व त्यानंतर सिटी सर्व्हेवर वरील दोन्ही जागा असताना सन २०१७ मध्ये त्या अचानक गायब कशा होऊ शकतात. ही सरकारी जागेची लूट असल्याने उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीकडे गायकवाड यांनी दाद मागितली आहे.
सोमवारी मावळ महसूलचे अधिकारी व लोणावळा मंडल अधिकारी यांना सुंदर भवनच्या जागेचा पंचनामा केला. अवैध उत्खननाच्या कामाला पायबंद घातला. लोकमतने दि. २७ मे रोजीच्या अंकात ‘ले आऊट मधून सरकारी जागा गायब’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल शासकीय यंत्रणांनी घेत तातडीने कारवाई केली. लोणावळा नगर परिषदेनेही काम बंद करण्याची नोटीस बजावली असून, कामाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.