राख्या बनवून घेतला स्वनिर्मितीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:31 AM2018-08-26T00:31:27+5:302018-08-26T00:31:48+5:30
डाळिंब शाळा : स्वनिर्मित राख्या पाठवणार भारतीय जवानांना
यवत : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून डाळिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक, टाकाऊतून टिकाऊ, उपलब्ध साहित्य वापर या संकल्पनेतून आकर्षकराख्या बनवल्या आणि स्वनिर्मितीचा आनंद घेतला. सर्व मुलींना राखी बनवण्याचे मार्गदर्शन डाळिंब शाळेच्या शिक्षिका अनिता भोसले यांनी केले. स्वनिर्मितीतून बनवलेल्या राख्या या छोट्या भगिनी
भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांनाही पाठविणार आहेत. तसेच, आपल्या लाडक्या भाऊ रायालाही स्वत: तयार केलेल्या या स्वनिर्मित राख्याच बांधणार आहेत. उर्वरित राख्यांची गावात विक्री करून सर्व मुले व्यवहारज्ञान व उत्पादकता यांचे धडे प्रत्यक्षात गिरवणार आहेत.
सर्व पालकांनी या राख्या विकत घेण्याच्या शाळेच्या आवाहनाला आनंदाने होकार देऊन प्रोत्साहन दिले आहे. पुस्तकातील नियोजित अभ्यासक्रमाबरोबरच या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती डाळिंब, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक यांनी मुलांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन डाळिंब शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला मालुंजकर, रवींद्र जाधव, अनिता भोसले, शालिनी पवार, मीना कुंजीर, दीपक कदम, आशा म्हस्के यांनी केले.