किस्सा निवडणुकीचा! कसबा मतदार संघातून रॅली; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बापट थेट बॉनेटवर

By राजू इनामदार | Published: November 5, 2024 03:19 PM2024-11-05T15:19:56+5:302024-11-05T15:21:02+5:30

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाय दुखायला लागल्याने बापट मांडी वगैरे घालून बॉनेटवर अगदी व्यवस्थित बसले

Rally from Kasba Constituency girish bapat directly on the bonnet on the last day of the campaign | किस्सा निवडणुकीचा! कसबा मतदार संघातून रॅली; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बापट थेट बॉनेटवर

किस्सा निवडणुकीचा! कसबा मतदार संघातून रॅली; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बापट थेट बॉनेटवर

पुणे : निवडणूक म्हणजे नुसती धामधुम. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच ती उमेदवारालाही दमवणारी असते. कोणाला भेटायचे, कोणाला नाही याची वेगळी गणिते असतात. त्याशिवाय रोजच्या प्रचारफेऱ्या, बैठका, काही वर्गांच्या एकत्रित भेटीगाठी असे बरेच काही असते. त्यात उमेदवार पार अर्धानिम्मा होऊन जातो. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, गिरीश बापट हे उमेदवार चालण्यासाठी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे कार्यकर्ते दमून जात, पण हे मात्र सकाळी जितक्या उत्साहात असत, तसेच किंबहूना त्यापेक्षाही जास्त उत्साहात संध्याकाळच्या प्रचारफेरीत सहभागी होत. त्यांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, निकटचे स्नेही अजूनही त्यांचे अनेक किस्से सांगत असतात.

गिरीश बापट यांच्याबद्दलचा एका निवडणुकीतील असाच एक किस्सा. कसबा विधानसभा मतदारसंघ हा बापट यांचा हक्काचा मतदारसंघ. अगदी सुरूवातीला ते एकदा इथून पराभूत झाले. त्यानंतर सलग ५ वेळा ते या मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले. खासदार झाल्यावरच त्यांचा हा मतदारसंघ सुटला. बापट यांच्या प्रचारात बऱ्याच गमतीजमती होत असतं. स्वत: बापट मिश्किल स्वभावाचे होते. एका प्रचार फेरीत मतदारसंघातून त्यांची रॅली निघाली. जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस. इतक्या दिवसांच्या प्रचाराने त्यांच्यावर चांगलाच ताण आला होता. पण तरीही ते फिरत होते. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होते.
अशाच एका गल्लीत त्यांचे पाय भलतेच दुखायला लागले. त्यांना अगदीच चालवेना. काय करायचे याचा विचार करत असतानाच मागे एक कार्यकर्ता चारचाकी गाडी चालवतच अभिवादन रॅलीत असलेला त्यांना दिसला. त्यांनी लगेचच त्याला पुढे बोलवले. बापटसाहेब बोलावतात म्हटल्यावर तोही लगेचच पुढे आला. गर्दी बाजूला झाली. गाडी बरोबर बापट यांच्यासमोर आली. बापट यांनी लगेचच गाडीच्या बॉनेटवर बैठक मारली. मांडी वगैरे घालून ते एका कडेला अगदी व्यवस्थित बसले.

तसे बसून त्यांनी रॅली सुरू करायला सांगितले. पुढचा सगळा परिसर त्यांनी असेच बॉनेटवर बसून मतदारांना अभिवादन केले. गाडीच्या बॉनेटवर बसलेले बापट, मागे झेंडे घेतलेले कार्यकर्ते, अशी ही मिरवणूक नंतर सगळ्या मतदारसंघात चर्चेचा विषय झाली होती.
 

Web Title: Rally from Kasba Constituency girish bapat directly on the bonnet on the last day of the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.