पुण्यातील राम बांगड यांचे १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेटलेट्स दान! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:44 AM2021-07-08T10:44:02+5:302021-07-08T10:48:59+5:30
राम बांगड हे ‘रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट’ या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांना सामाजिक सेवेची आवड
धनकवडी: सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वयाच्या ६४ व्या वर्षापर्यंत तब्बल १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेट लेट्स दान केलेले असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या राम बांगड यांच्या कार्याची दखल एक विक्रम म्हणून घेतली गेली आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नुकतीच त्यांनी आजवर केलेले प्लाझ्मा दानाचे काम विक्रम म्हणून नोंदवले गेले आहे.
राम बांगड हे ‘रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक सेवेची आवड होती. १९७६ साली एका दुर्घटनेमध्ये एका मुलीला रुग्णालयात रक्ताची गरज असल्याने त्यांनी मदत केली आणि तो क्षणच आयुष्यात प्रेरणा देणारा ठरला. तेव्हापासून त्यांनी स्वत: रक्तदान करण्यास सुरुवात केली. आजवर १३४ वेळा त्यांनी स्वतः रक्तदान केलेले आहे. हा परीघ विस्तारावा म्हणून २००१ साली त्यांनी ‘रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना केली. त्या माध्यमातून रक्तदान शिबीरे आयोजित करून आजवर हजारो बाटल्या रक्त संकलित केले आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. आजवर १५ राज्ये आणि २२ जिल्ह्यांत त्यांनी ५० हजार रक्तदाते उभे केले आहेत. तर ट्रस्टच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक शिबीरे आयोजित केलेली आहेत.
कोरोनाकाळात ९०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी प्रयत्न
कोरोनाकाळात देशभरात ९०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या या विधायक सामाजिक कामासाठी त्यांना दोनशे हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
आपल्या कार्याची विक्रमी नोंद झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राम बांगड म्हणाले, ‘‘रक्तदानासारखं कोणतंही सर्वश्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकाने घ्यायला हवा. सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून रक्तदान करायला हवे. आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने माझ्या कामाची दखल घेतली याचा निश्चितच आनंद आहे.