सुंदर भागाची सुरक्षा रामभरोसे,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:36 AM2018-05-27T03:36:18+5:302018-05-27T03:36:18+5:30
‘झाडे लावा झाडे जगवा,’ जल हेच जीवन, टेकड्या वाचवा, जंगले-वने वाचवा, टेकड्या निसर्गाची फुफ्फुसे आहेत, असे प्रशासन एकीकडे सुंदर उपदेश व जाहिरातबाजी करीत असते. तळजाई वनविहारातील वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
- गौरव कदम
सहकारनगर - ‘झाडे लावा झाडे जगवा,’ जल हेच जीवन, टेकड्या वाचवा, जंगले-वने वाचवा, टेकड्या निसर्गाची फुफ्फुसे आहेत, असे प्रशासन एकीकडे सुंदर उपदेश व जाहिरातबाजी करीत असते. तळजाई वनविहारातील वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांत सलग १० ते १२ वेळा अनेक भागात आगी लागल्या किंवा लावल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी झाडेझुडपे, गवत जळून खाक झाले. पक्षी-प्राण्यांची अंडी, पिले यात होरपळून गेली. वनविभागाच्या दोन-तीन लोकांच्या मदतीने आगी, वणवे विझविले जातात. मात्र नुकसान होतच आहे. सध्या येथील सुरक्षा रामभरोसे असल्याची स्थिती आहे.
पुणे शहरातील वनविभागाच्या ताब्यात असलेले तळजाई टेकडीवरील पचगाव-पर्वती या संरक्षित भागाचे क्षेत्रफळ कदाचित सर्वाधिक भरेल. साधारणपणे ५५० एकर भागात हे वसलेले आहे. यामधील बराच भाग धनकवडी, सहकारनगर, जनता वसाहत, सिंहगड रोड यांनी वेढला गेला आहे. नितांत सुंदर नैसर्गिक वातावरण, जैवविविधता लाभलेल्या या भागात नुसते स्थानिकच नव्हे, तर पुण्याच्या अनेक भागांमधील हजारो नागरिक सकाळ, संध्याकाळी येथे नित्यनियमाने आज अनेक वर्षे फिरायला येत आहेत.
अनेक वर्षे येणारे हे जाणकार नागरिक, पर्यवरणाप्रेमी मंडळी व इतर सर्वच जण प्लॅस्टिक पिशव्या किंवा कॅनमधून पाणी आणून वेळोवेळी झाडांना पाणी देणे त्याची काळजी घेऊन देखभाल ठेवणे, पक्ष्या-प्राण्यांकरिता छोटी भांडी जंगलात झाडावर लावून पाणी भरणे, या मुक्या जीवास अन्न देणे, तसेच कुठे आग, वणवा लागल्यास त्याची माहिती गेटवर वनविभागाच्या कर्मचऱ्यास देऊन ती विझविणे, जंगलात मोर, ससे, लांडोर यांचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीपासून जीव वाचविण्यासारखी अनेक कामे जागरूक राहून तळजाई वन वाचवण्याचे व टेकडी संवर्धनाचे काम करीत आहेत.
अलीकडल्या ३ ते ४ वर्षांत मोकाट कुत्री, डुकरे यांचाही उपद्रव बºयाच प्रमाणात वाढला गेला. कुत्रे, मोर, ससे, लांडोर यांना लक्ष्य करून आपले भक्ष साधत आहेत, तर डुकरे, मोरांकरिता पक्ष्यांकरिता ठेवलेले पाणी व धान्य फस्त करीत झाडेदेखील उद्ध्वस्त करत आहेत. कचºयाचे ढीग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. संबंधित तळजाई वनविहार व परिसराचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना संबंधित अधिकारी, खाते, प्रशासन यांना हे दिसत नाही का?
काही महिन्यांपूर्वी याच संरक्षित भागामध्ये सिमेंट काँक्रिटचे मोठाले पाण्याचे टॅँक बांधले गेले आहेत, याचे नियोजन काही लक्षात येण्याजोगे नाही. कारण याचा वापर आजूबाजूचे तरुण स्विमिंग टॅँक म्हणून करताना आढळत आहेत. पक्ष्या-प्राण्यांच्या पाण्याच्या नियोजनाकरिता असेल तर तेही त्याचा आकार व खोली पाहता अवघडच आहे. एक ठिकाणी नुकताच सिमेंटचा भला मोठ्या आकाराच्या कट्टा बांधण्यात आला आहे. मग संरक्षित वनक्षेत्रात सिमेंट कॉँक्रिटचे खेळ कशाला? अशी संरक्षित क्षेत्र आहे तशीच अबाधित ठेवणे गरजेचे आहे. पाचगाव पर्वतीचे निसर्ग, वातावरण स्वच्छ व सुंदर ठेवण्यात पुणेकरांचा मोठा वाटा आहे. यात शंका नाही, गरज आहे ती संबंधित अधिकारी यांनी लोकांना विश्वासात घेऊन याविषयक तोडगा काढण्याची.
पगार, सुविधा मिळेना; समाजकंटकांचा त्रास
सहकारनगर येथील नागरिक असून माझ्या कुटुंब व टेलस आॅर्गनायझेशन संस्थेसह येथे गेली १२ वर्षे टेकडी संवर्धनाकरिता काम करीत असल्याने हे सुरक्षारक्षक चांगले परिचयाचे होते. येथे फिरायला येणाºया अनेक नागरिकांचेदेखील होते. त्यामुळे हे कर्मचारी येथे कशा प्रकारे काम करतात? कोणत्या परिस्थितीत काम करतात? ज्या कोठीत राहतात त्या कोठीची अवस्था काय आहे? यांचे पगार वेळेवर मिळतात का? सुरक्षा कर्मचारी म्हणून कोणत्या सुविधा उपलब्ध होत्या? या सर्वच बाबी जवळून पाहिल्या होत्या. गस्त घालताना काही वेळा समाजकंटक लोकांनी यांना अनेक वेळा रक्तबंबाळ व जखमी होईपर्यंत मारहाण केलेले अनेकांनी पाहिलं आहे. यांच्या कोठीवर जाऊन दमदाटी करणं, धमकावणे असले प्रकार होत होते.
गेल्या ४ वर्षांपासून फंड नाही, म्हणून अनेक सुरक्षारक्षक यांची हकालपट्टी झाली. मग नवीन सुरक्षा कर्मचाºयांचा अनुदानाचे काय? हे कुठून येणार होते? मग काही काळापासून अर्धवट अवस्थेत असलेल्या संरक्षक भिंतीचे मोठ्या रकमेचे काम सुरू झाले. एकीकडे सुरक्षा करणाºयांना पैसे नाही म्हणून काढले, मग संरक्षक भिंत पूर्ण करण्यास कुठून व कसा निधी आला? जर संपूर्ण वनक्षेत्रात भिंत टाकल्यास एकही सुरक्षा कर्मचारी न ठेवता सर्वच प्रश्न त्वरित मार्गी लागणार, असा समज असल्यास काही शंका उपस्थित होतात.
- लोकेश बापट, निसर्गप्रेमी