राम गणेश गडकरींच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:31 AM2019-01-23T10:31:54+5:302019-01-23T11:04:11+5:30
भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला.
पुणे - भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे, पुणे जिल्हा अध्यक्ष विजय शेखदार, पुणे शहर अध्यक्ष मयुरेश आरगडे, चिन्मय पाठक, तेजस पाठक, सोमनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
तीन वर्षांपूर्वी संभाजी उद्यानातील पुतळा नराधमांनी तोडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसाच्या आत पुतळा बसवून देतो असे आश्वासन दिले. परंतु गेली तीन वर्षे झाली हा पुतळा बसवण्यात आला नाही. पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आम्ही गडकरी यांचा नवीन पुतळा देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांनी हा पुतळा घेतला नाही. पालिका स्वखर्चाने पुतळा उभारेल असे आम्हाला सांगण्यात आले. महानगरपालिकेने पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. महासंघ आक्रमक भूमिका घेऊन स्वखर्चाने पुतळा उभारणार आहे. पुणे शहरातील कुठल्याही परिसरात हा पुतळा बसवून दयावा अशी मागणी महासंघाने केली.
आता स्मारकाची अवस्था बघितली तरी अजून काम चालू आहे. महानगरपालिका फक्त आश्वासन देते. हे स्मारक होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. दर दोन महिन्यांनी आम्ही दादोजी कोंडदेव, गडकरी यांच्या पुतळ्याची आठवण करून देत होतो. महानगरपालिकेकडून असे सांगण्यात आले की सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची आम्ही काळजी घेत आहोत.
- आनंद दवे - प्रवक्ते, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ