हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम मिळते, त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावं - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 06:49 AM2017-10-02T06:49:04+5:302017-10-02T06:52:11+5:30
नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे.
पुणे - नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. लष्करात चांगले खायला, प्यायला मिळते. शरीरयष्टी चांगली राहते, असे सांगतानाच रामदास आठवले यांनी हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम वगैरे मिळते. त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावं, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. लष्करात गेलेले लोक शहीद होतात असे नाही, त्याउलट अपघात आणि इतर आजारांनी मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असेही ते म्हणाले.
एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत आणि लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना दलित समाजातील तरुणांसाठी सैन्य दलात आणि त्याच्या संलग्न विभागांमध्ये नोकरीसाठी विशेष आरक्षण असावे, या मागणीचा आठवले यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, आम्ही लढवय्ये असून, देशासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. दलित समाजातील तरुणांना आता बाहेर नोकऱ्या मिळत नाहीत. लष्करात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळे दलित युवकांनी लष्करात भरतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
महागाई अजून कमी झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या कामाचे रिझल्ट येण्यास वेळ लागेल. मोदींना अजून 5 वर्षे मिळाली तर ते बदल दिसून येऊ शकतील असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, पेट्रोलवर मोठयाप्रमाणात लागलेले कर कमी होणे आवश्यक आहे. महागाई कमी करण्यासाठी जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ. मुंबईमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये २२ लोकांचा झालेला मृत्यू ही गंभीर गोष्ट आहे. याप्रकररणाची न्यायालयीन चौकशी करून जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी. बुलेट ट्रेन नको अशी मागणी होत आहे, ती चुकीची आहे. उद्या विमान नको अशी मागणी होईल. नोटबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेतला गेला होता. सोशल मिडीयावर सरकार विरोधी मत व्यक्त करणाºया पत्रकार व इतरांना नोटीसा देणे योग्य नाही.
सफाई कर्मचा-यांना जास्तीत जास्त वेतन मिळावे, त्यांना कंत्राटी पध्दतीने काम करावे लागू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात १३ हजार सफाई मजदुर हाताने मैला उचलत असल्याचे एका सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे, ही प्रथा बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेले जात आहेत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाकडून गेल्या १७ दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सेवा अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्वच्छतेसाठी केंद्राकडून मोठयाप्रमाणात प्रयत्न करण्यात आहेत, शासनाबरोबरच जनतेनेही यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.