शंकर महादेवन, राहुल देशपांडे यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:40 PM2018-01-24T14:40:17+5:302018-01-24T14:46:22+5:30
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रसिध्द गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रसिध्द गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राम कदम कलागौरव पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. यावर्षीपासून संगीत आणि कला क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दोन व्यक्तींना हा पुरस्कार देण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आला आहे. त्यानुसार, शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांची निवड केल्याचे खाबिया यांनी सांगितले.
प्रतिष्ठानतर्फे पहिला पुरस्कार जगदीश खेबूडकर यांना देण्यात आला होता. त्यानंतर भास्कर चंदावरकर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, सुरेश वाडकर, अरुण दाते, अनुराधा पौडवाल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.