Ram Navami: पुण्यातील तुळशीबाग राम मंदिरात ' कुलभूषणा, दशरथ नंदना बाळा जो जो रे ...' चे निनादले स्वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 03:10 PM2022-04-10T15:10:33+5:302022-04-10T15:10:40+5:30
श्री रामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीने श्रीरामजन्म सोहळा
पुणे : कुलभूषणा, दशरथ नंदना बाळा जो जो रे ... आरंभी वंदीन अयोध्येचा राजा... चे स्वर पुन्हा एकदा रामभक्तांच्या गर्दीत पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात निनादले. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष मोठया थाटात मंदिरात साजरे झाले. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मंदिराच्या सभामंडपात लावलेला पाळणा हलला आणि रामनामाचा एकच नामघोष झाला. रामभक्तांनी फुलांची उधळण करीत रामजन्म सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवला.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कीर्तनकार दर्शनबुवा वझे यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.
मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरात आकर्षक पुष्पसजावट, झुंबरांची व विविधरंगी लाईटची विद्युतरोषणाई करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन व पाळणा म्हणजेच रामजन्म सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.