रामकथामाला नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:28+5:302021-03-25T04:11:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “जगातील विविध प्रांत व देशांमधील रामकथा कलेच्या माध्यमातून पुढे आणणारे ‘रामकथामाला’ हे पुस्तक बोधप्रद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “जगातील विविध प्रांत व देशांमधील रामकथा कलेच्या माध्यमातून पुढे आणणारे ‘रामकथामाला’ हे पुस्तक बोधप्रद असून, नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
दीपाली पाटवदकर यांनी लिहिलेल्या आणि विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित ‘रामकथामाला’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कन्याकुमारीतील विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदास, सहसचिव शैलेंद्र बोरकर, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाच्या व्यवस्थापिका वसुधा करंदीकर, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, विश्वास लापालकर, सुजाता दळवी, सुनील कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
‘राम अनंत, रामकथा अनंत’ असल्याचे सांगून कोश्यारी म्हणाले, “लोकांच्या पिढ्या जन्मतील आणि कालप्रवाहात जातील, परंतु रामकथा शाश्वत व कालजयी आहे. परकीय राजवटीत भारतातून अनेक लोकांना दूरदेशात मजूर म्हणून नेले गेले. काही लोक अन्यत्र स्थलांतरित झाले. मात्र, त्या-त्या देशांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही आपल्या लोकांनी धर्म व संस्कृती न बदलता रामकथा जपून ठेवली.”
“रामकथामाला या पुस्तकात वाल्मीकी, कालिदास यांच्यापासून ‘गदिमां’पर्यंत विविध कवींनी लिहिलेली रामकथा आहे. लोकसाहित्यातील, वनवासी परंपरेतील आणि लोककलेतील विविध रामकथांचे वर्णन, जैन, बुद्ध व शीख साहित्यातील रामकथांची माहिती, भारताच्या विविध राज्यांतील व बाहेरील देशातील रामायणांचे वर्णन आहे,” असे लेखिका दीपाली पाटवदकर यांनी सांगितले. विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. अभय बापट यांनी आभार मानले.