‘ग्रीन फेस्टिव्हल’मध्ये रमणबागेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:08 AM2019-01-19T00:08:28+5:302019-01-19T00:08:32+5:30
पर्यावरणाबाबत एकांकिकेतून जागृती : विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश
पुणे : पर्यावरण विषयावर आधारित ग्रीन थिएटर फेस्टिव्हलमधील एकांकिका स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे यंदाही रमणबाग प्रशालेने प्रथम पारितोषिक पटकावित आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्यादेवी हायस्कूलने, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक खडकी येथील रेंजहिल्स इंग्लिश मीडियम स्कूल व डी. ई. एस. सेकंडरी स्कूलला विभागून मिळाले. कर्वेनगर येथील महिला आश्रम हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. पाण्याचे महत्त्व... कचरा व्यवस्थापन... वृक्षसंवर्धन... स्वच्छ भारत... प्लॅस्टिकबंदी... अशा विविध सामाजिक समस्यांवर एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स -मुंबई, युवा थिएटर्स चिंचवड, उन्नती ट्रस्ट या संस्थांच्या वतीने या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे पार पडली. पारितोषिक वितरणप्रसंगी यशदाच्या उपमहासंचालक प्रेरणा देशभ्रतार, ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी, सुभाष तगारे, रोहित नागभिडे, परेश पिंपळे, इंद्रायणी पिसोळकर, विश्वनाथ जोशी, आबा शिंदे उपस्थित होते. पुणे शहरांतील विविध शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. दीपाली निरगुडकर, नितीन धंदुके, नितीन सुपेकर यांनी अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परीक्षण केले. प्रकाश पारखी म्हणाले, की नाटक हा एखादा विषय प्रभावीपणे मांडण्याचे उत्तम माध्यम आहे. पर्यावरण हा महत्त्वाचा विषय घेऊन नाटकांचे सादरीकरण झाले याचा आनंद आहे. नाटक करायचे असल्यास त्यामधील नाट्यशास्त्रदेखील समजून घेतले पाहिजे. अभिनयाबरोबरच वेशभूषा, रंगभूषा या गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
शोभा नरके यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ जोशी यांनी आभार मानले.
महिला हायस्कूल द्वितीय, रेणुका स्वरूप तृतिय
पर्यावरणमित्र शाळा विभागात अहिल्यादेवी हायस्कूल प्रथम, महिलाश्रम हायस्कूल द्वितीय, रेणुका स्वरुप हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन रवींद्र सातपुते प्रथम, अनिता खैरनार द्वितीय आणि मीनल साकोरे व प्रीतम पिसरेकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. लेखन विभागातील प्रथम क्रमांक अद्वैता उमराणीकर, द्वितीय क्रमांक संगीता कुलकर्णी आणि कांचन सोलापूरकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. सर्वोत्कष्ट एकांकिका रुपये २५ हजार, द्वितीय क्रमांक २० हजार, तृतीय क्रमांक १५ हजार आणि चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता रितेश वाघमारे, अभिनेत्री साक्षी कांबळे यांनादेखील पारितोषिके देण्यात आली.