रमाईंचे कर्तृत्व काकणभर सरसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:50+5:302021-02-07T04:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कृतिशील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात साथ देण्यापुरते रमाईंचे कर्तृत्व मर्यादित नाही. जीवनातील अनंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृतिशील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात साथ देण्यापुरते रमाईंचे कर्तृत्व मर्यादित नाही. जीवनातील अनंत अडचणींचा सामना करून बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रमाईंचे कर्तृत्व बाबासाहेबांपेक्षा काकणभर सरस आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीचे औचित्य साधून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. सुधाकरराव आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता वाडेकर यांना ‘रमाईरत्न पुरस्कार’ डॉ. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंचशील शाल, रमाईंचा ग्रंथ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, स्वागताध्यक्षा लता राजगुरू, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर, परशुराम वाडेकर उपस्थित होते.