रामदास आठवले यांच्यावर राजशिष्टाचार भंगाचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:20 AM2018-07-06T02:20:55+5:302018-07-06T02:21:07+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे.
पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. वाडिया महाविद्यालयानजिकच्या एका उद्यानात महापालिकेने उभारलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यात राजशिष्टाचारांचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेकडे खुलासा मागितला होता.
कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेकडे होते. त्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडे दिली होती. त्यात कोणी कुठे बसायचे, किती वेळ बोलायचे इथपासून ते छायाचित्र कसे काढायचे याबाबत अनेक सूचना राष्ट्रपती कार्यालयाने दिल्या होत्या. प्रत्यक्षात पुतळ्यावरील पडद्याचे अनावरण रिमोटने करण्याऐवजी दोरीने करण्यात आले. कार्यक्रम संपवून राष्ट्रपती निघालेले असताना ऐनवेळी त्यांना पुतळ्याजवळ थांबवून त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यात आली. त्यावेळी राजशिष्टाचाराचा भंग झाल्याची चर्चा सुरू झाली होती.