कमळासोबत, पण कमळ चिन्हावर लढणार नाही - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:47 AM2019-06-24T06:47:40+5:302019-06-24T06:47:59+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष युतीसोबतच राहणार असून पक्षाला राज्यभरात दहा जागा हव्या आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष युतीसोबतच राहणार असून पक्षाला राज्यभरात दहा जागा हव्या आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. आम्ही कमळासोबत असलो तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपद दोन्ही पक्षांनी दोन-दोन वर्षे घेऊन आम्हाला एक वर्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी केली.
ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला आठ जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीतील मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत. आमचा पक्ष मोठा असल्याने त्यातील १० जागांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत व इतर मित्रपक्षांना उर्वरीत जागा द्याव्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकेबाबत ते म्हणाले, कदाचित काही मशिन अशाही असतील की, कमळाचे बटन
दाबले तर घड्याळाला मत जात असेल. त्यामुळे सुप्रियाताई निवडून आल्या. उदयनराजे तुम्ही राजीनामा देऊ नका. तुम्ही पवारांच्या पक्षात असला तरी आतून आमच्यासोबत आहात. बॅलेट पेपरची मागणी संसदेत मांडा.
‘व्हीजेएनटी’ला १० टक्के आरक्षणासाठी प्रयत्न
देशात व्हीजेएनटीची स्थिती एससी-एसटी पेक्षाही गंभीर आहे. देशात सध्या ६० टक्के सामाजिक आरक्षण आहे. त्यामध्ये आणखी ८ ते १० टक्के आरक्षण व्हीजेएनटीला देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यास ओबीसीवरही अन्याय होणार नाही. व्हीजेएनटीला लोकसभा व विधानसभेमध्येही आरक्षण मिळायला हवे. मुस्लिम समाजालाही ८ ते ९ टक्के आरक्षण मिळावे, असे आठवले यांनी सांगितले.