Ramdas Athawale: पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी एकदाच आरपारची लढाई करावी लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:59 PM2021-10-19T16:59:35+5:302021-10-19T16:59:43+5:30
राज्यातून उद्योगधंद्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या अनेकांना दहशतवाद्यांनी लक्ष केले आहे. हे सर्व रोखण्यासाठी पाकिस्तान वर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल
पुणे : पाकिस्तान कडून जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले करण्याचा डाव रचला जातोय. तिथे काम करणार्या मजुरांवर आतंकवादी हल्ले सुरू आहेत. अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये येत असतात त्यांना आतंकवादी ठार मारत आहेत. इतर राज्यातून उद्योगधंद्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या अनेकांना दहशतवाद्यांनी लक्ष केले आहे. हे सर्व रोखण्यासाठी पाकिस्तान वर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले, या आधी एकदा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन जर भारतीय सैनिकांवर भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ले केले जात असतील तर पाकिस्तानवर पुन्हा एक सर्जिकल स्ट्राइक करावं लागेल. पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबवले नाही तर एकदा आरपारची लढाई लढावी लागेल. पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये
आठवले म्हणाले, भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळू नये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत आहे. जयेश शहा यांना देखील मी हे सांगणार आहे.