रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:28 AM2022-09-21T09:28:25+5:302022-09-21T09:28:34+5:30

राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे

Ramdas Kadam will not be allowed to roam in Marathwada Warning of Sushma Andhare | रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

googlenewsNext

पुणे : राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे. ज्यांच्यामुळे सगळे वैभव मिळाले त्यांच्याबद्दलच अश्लाघ्य संशय व्यक्त करणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. अंधारे यांनी पुण्यात शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे त्यांच्या समवेत होते. 

अंधारे म्हणाल्या, कदम यांचे आताचे सगळे वैभव शिवसेनेमुळेच आहे हे ते विसरलेले दिसतात. भाजप हिटलर नीतीचा अवलंब करत आहे. किरीट सोमय्या, नवनीत राणा व मोहित कंभोज अशी तीन अमराठी माणसे त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याकरिता नियुक्त केली आहेत. त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या मिंधेसेनेचा वापर ते गोबेल्सप्रमाणे अफवा पसरवण्यासाठी करून घेत आहेत. मिंधेसेनेला स्वार्थापोटी ते समजायला तयार नाही.
मिंधेसेना बाहेर गेली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शांतपणे वर्षा बंगला सोडला. त्यांनी कसलाही आक्रस्ताळेपणा केला नाही. आकांडतांडव केले नाही. त्यांच्या अंगी सभ्यपणा आहे. मिंधेसेनेला मात्र सभ्यपणा दाखवायला जमत नाही. ज्या नारायण राणे यांनी रामदास कदम यांना कायम हिणवले, आजही ते त्यांना मान द्यायला तयार नाहीत व तरीही कदम त्यांच्याबरोबर बसतात, उठतात यावरून त्यांची पात्रता काय आहे समजते. आम्ही त्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही. शिवसेना त्यांच्याविरोधात उद्यापासूनच आंदोलन सुरू करेल, असा इशारा अंधारे यांनी दिला.

Web Title: Ramdas Kadam will not be allowed to roam in Marathwada Warning of Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.