Pune News: मांजरीला वाचवायला गेला, तरुण खाणीत पडला; पुण्यातील वेताळ टेकडीवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 10:31 AM2022-01-13T10:31:58+5:302022-01-13T10:32:56+5:30
अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर, तरुण आपल्या दोन बहीणींसह वेताळ टेकडीवर सकाळी फिरण्यासाठी आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मांजरीला वाचविताना वेताळ टेकडीवरील ७० फुट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रामदास उभे (वय २४, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून डोक्याला इजा झाली आहे.
याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी राजेश जगताप यांनी सांगितले की, रामदास उभे हा आपल्या २ बहिणींसह वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला आला होता. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टेकडीवरील खाणीच्या वर एका मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो खाली ७० ते ८० फुट खोल असलेल्या खाणीत पडला. अग्निशामक दलाला सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी याची खबर मिळाल्यावर अग्निशामक दलाचे जवान तातडीने तेथे गेले. मात्र, गाडी खाणीजवळ पोहचू शकत नव्हती. छोट्या गाडीने जवान खाणीजवळ पोहचले. उभे हा खाणीतील झुडपे व पाणी याच्यामध्ये पडला होता. त्याच्या पायाला इजा झाल्याने तो चालू शकत नव्हता. काही जवान दोरीच्या सहाय्याने त्याच्याजवळ पोहचले.
खाणीत काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी छातीपर्यंत पाणी आहे. काही जवान पाण्यातून तेथपर्यंत गेले. या ठिकाणी १०८ ची रुग्णवाहिकाही आली होती. रुग्णवाहिकेतील स्ट्रेचरवर या तरुणाला घेतले. मात्र, इतक्या उंचावर त्याला स्ट्रेचरवरुन वर उचलून घेणे शक्य नव्हते. तेव्हा जवानांनी त्याला पाण्यातून कमी उंची असलेल्या ठिकाणी आणले. तेथून त्याला वर उचलून घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक अमोल शिंदे, विजय शिंदे, तांडेल सचिन आयवळे, राजेश कुलकर्णी व जवान सचिन वाघोले, शैलेश दवणे, जितेंद्र कुंभार, प्रविण रहाटे, पंढरीनाथ उभे, संजय भावेकर, प्रकाश कांबळे, शुभम गोल्हार, हेमंत कांबळे यांनी सहभाग घेतला.