अतिरेक्यांना पैसा पुरविणाऱ्या रमेश शहाला पुण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:53 PM2018-06-21T14:53:43+5:302018-06-21T14:53:43+5:30
काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी तसेच ईशान्य राज्ये व कर्नाटक सह अनेक राज्यात अतिरेक्यांना पैसे पुरविण्यात महत्वाची भूमिका असलेल्या रमेश शहा (वय २८) याला उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मंगळवारी अटक केली़.
पुणे : काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी तसेच ईशान्य राज्ये व कर्नाटक सह अनेक राज्यात अतिरेक्यांना पैसे पुरविण्यात महत्वाची भूमिका असलेल्या रमेश शहा (वय २८) याला उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मंगळवारी अटक केली़. त्याला शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करुन त्याचा तीन दिवसांचा ट्रान्झिटर कोठडी घेण्यात आली़ गोरखपूरमधून गेल्या ३ महिन्यांपासून तो फरार होता़.
पुण्यातील नऱ्हे येथील एका खोलीमध्ये तो रहात असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली़ त्यांनी पुणे एटीएसशी संपर्क साधला़ त्यांच्या मदतीने नऱ्हे येथे मंगळवारी सकाळी त्याच्या रुमवर छापा घालून ताब्यात घेतले़ गोरखपूर येथून तो फरार झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तो लपून रहात होता़. सुमारे १५ दिवसांपूर्वी तो पुण्यात आला होता़ एका ओळखीच्या मदतीने त्याने नऱ्हे येथे एक खोली घेतली होती़. पाकिस्तानचे हँडलर आणि अतिरेक्याचे आॅपरेटर यांच्यात सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची देवाणघेवाण करण्यात आल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे़ ही रक्कम मध्यपूर्वेतून येत असे़ तिचे वितरण काश्मीर, ईशान्य राज्ये तसेच इतर वेगवेगळ्या राज्यात केले जात होते़ पाकिस्तानी हँडलरने दिलेल्या सूचनेनुसार इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यामधून ही रक्कम वितरित करण्यात आली़ गोरखपूर टेरर फंडिगच्या या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएस पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली़.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या टोळीचा रमेश शहा हा मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले़ रमेश शहा हा बिहारमधील गोपळगंज येथील राहणारा असून गोरखपूर येथे एक शॉपिग मार्केट चालवित आहे़ हे प्रकरण बाहेर आल्यापासून गेल्या ३ महिन्यांपासून तो फरार होता़ उत्तर प्रदेश एटीएसची पथके त्याचा अनेक राज्यात शोध घेत होती़ तो पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यावर उत्तर प्रदेश एटीएसने पुणे एटीएसशी संपर्क साधला़ त्यांच्या मदतीने उत्तर प्रदेश एटीएसने रमेश शहा अटक केली़.