रामोशी समाज एसटी आरक्षणासाठी पुकारणार एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:26 PM2018-08-21T20:26:43+5:302018-08-21T20:27:49+5:30
राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने व मोर्चा काढले.
बारामती : मराठा, धनगर समाजापाठोपाठ रामोशी समाज एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाज गुरुवारी (दि. २३) एल्गार मोर्चा काढणार आहे. यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने कारभारी सर्कल, गुणवडी चौक, बसस्टँड, रिंग रोडमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते बबन खोमणे यांनी माहिती दिली.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत खोमणे बोलत होते. या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यात आली.राज्यात रामोशी, बेरड, बेडर समाजाची लोकसंख्या ७० ते ८० लाख आहे. बेरड, बेडर रामोशी समाज हा क्रांतीकारी समाज आहे. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले. ब्रिटिशांना सळो की पळो करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचेही स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोलाचे योगदान आहे.
राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने केली, मोर्चा काढले. त्याचबरोबर शासनाच्या विविध पातळीवर निवेदने दिली. महाराष्ट्र स्तरावर रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले.
कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चातील प्रमुख मागणीही रामोशी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी होती. या मोर्चादरम्यान आम्हाला आश्वासन दिले होते. रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.परंतु, आजतागायत निर्णय झाला नाही. त्यामुळे जय मल्हार संघटनेच्या माध्यमातून १६ आॅगस्ट पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे.आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आमच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून सप्टेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, संभाजी चव्हाण, मनोज पाटोळे, नाना जाधव, आबासो जाधव, सोमनाथ जाधव, सोमनाथ मदने, सागर खोमणे, गणेश जाधव, दादा चव्हाण आदी उपस्थित होते.