पुणे स्थानकावरील रॅम्प बंद, प्रवाशांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:27+5:302021-06-05T04:09:27+5:30
- स्थानकावर एकही लिफ्ट नाही लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे स्थानकावरील पादचारी पुलाला जोडलेला रॅम्प गेल्या वर्ष ...
- स्थानकावर एकही लिफ्ट नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे स्थानकावरील पादचारी पुलाला जोडलेला रॅम्प गेल्या वर्ष भरापासून बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी उपाययोजना न करताच रॅम्प बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना पुलावरुन बाहेर पडण्यासाठी पायऱ्याचा वापर करावा लागत. यात प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे.
पुणे स्थानकावरील सोलापूरच्या दिशेने असलेल्या पादचारी पूल क्रमांक तीन हा बंद आहे. फलाट दोन व तीन वर सरकता जिना आहे. मात्र फलाट चार, पाच आणि सहा क्रमांकावर ना सरकता जिना आहे, ना लिफ्ट आहे. त्यामुळे या तिन्ही फलाटावर रेल्वे आल्यानंतर प्रवाशांना जिन्याचे पायऱ्या चढत पुलावर यावे लागते. मोठ्या सामानासह जिना चढणे खूप त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे हा रॅम्प पूर्ववत सुरू व्हावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
-------------------------
दिव्यांगांची मोठी गैरसोय
पुणे स्थानकावरून प्रवास सुरु करताना किंवा पुणे स्थानकावर उतरल्यानंतर जर प्रवासी दिव्यांग किंवा जेष्ठ नागरिक असतील तर त्यांना मोठ्या अडचणीना तोंड द्यावे लागते. पूर्वी रॅम्प असल्याने त्यांना व्हीलचेअर वरून ढकलत नेता येत होते. आता रॅम्प बंद असल्याने कुली त्यांना उचलून आणत आहे. त्यासाठी ते चारशे ते पाचशे रुपये घेतात.
---------------------
फलाटावर लिफ्ट हवी ;
पुणे स्थानकावर तीन पादचारी पुल आहे. यापैकी रॅम्प असलेला बंद आहे. तर मुंबईच्या दिशेने असलेला व नवीन 12 मीटर रुंदीचा पूल वापरात आहे. नवीन पुलावर येण्यासाठी व उतरण्यासाठी सरकता जिना आहे. शिवाय फलाट दोन व तीन वर देखील एक सरकता जिना आहे. एकवेळ दिव्यांग प्रवाशांना व्हीलचेयर सहित सरकता जिना वरून घेऊ जाऊ शकू, पण रुग्णांना स्ट्रेचरसह कसे घेऊन जाणार. अनेक जन दिव्यांग व्यक्ती व रुग्णांना धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडून घेऊन जातात. त्यामुळे ज्या ठिकाणी जिना आहे. त्या बाजूला लिफ्ट असणे गरजेचे आहे.
-----------------
सुरक्षेच्या कारणास्तव अचानकपणे आम्हाला हा रॅम्प बंद करावा लागला. आम्ही रॅम्पच्या मजबूती साठी लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेत आहोत.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे