किल्ले रोहिडेश्वर प्रवेशद्वाराजवळील तटबंदी ढासळली, गडावर जाणारी पायावट बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:21 PM2023-08-11T21:21:18+5:302023-08-11T21:25:01+5:30
हिंदवी स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा अतिशय समर्पक उपयोग करून मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले अशा शिवकाळातील रोहिडा किल्ला भोर तालुक्यातील बाजारवाडीजवळ आहे...
भोर (पुणे) : हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रोहिडेश्वर ( रोहिडा ) गडावर जाणाऱ्या प्रथमदर्शनीय प्रवेशद्वाराजवळील तटबंदीचा बुरुज पावसामुळे ढासळला आहे. ज्या वाटेने पर्यटक गडावर जातात त्या पायवाटेवर दगड, माती, राडारोडा आल्याने पायवाट बंद झाली आहे, तर काही तटबंदीच्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदीला धोका असल्यामुळे दुरुस्ती करण्याची मागणी शिवप्रेमी व बाजारवाडीचे ग्रामस्थ करीत आहेत.
भोरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुधवार, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळल्यामुळे गडावर पर्यटकांना जाणे अवघड झाले आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी ढासळण्याच्या अवस्थेत आहे, तर ढासळलेल्या तटबंदीचा दगडी, माती, चुनखडीचा राडारोडा हा पर्यटक ज्या वाटेने गडावर चढतात त्या वाटेवर आला असल्यामुळे गडावरील पायवाट बंद झालेली आहे.
हिंदवी स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा अतिशय समर्पक उपयोग करून मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले अशा शिवकाळातील रोहिडा किल्ला भोर तालुक्यातील बाजारवाडीजवळ आहे. ऐतिहासिक कागदपत्रातून याला ‘विचित्रगड’ व ‘बिनीचा किल्ला’ अशा नावानेदेखील संबोधले जाते. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ११०५ मीटर म्हणजेच ३६२५ फूट आहे. बाजारवाडी गावापासून किल्ल्यावर चढण्यासाठी सर्वांत चांगली मळलेली पायवाट असून गडावर चढण्यासाठी एक तास लागतो. गडावर प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा असून, त्याची बांधकाम शैली अशी आहे की दरवाजा आपणास दिसून येत नाही. हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. प्रथमदर्शनी असलेल्या दरवाजाच्या चौकटीवर भक्कम गणेश पट्टी असून तिच्यावर मिहराब आहे. याच प्रवेशद्वाराच्या शेजारील असणारी तटबंदी बुरूज पावसामुळे ढासळला असल्यामुळे गडाचे ऐतिहासिक महत्त्व कमी झालेले दिसत आहे. शासन एकीकडे गडसंवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये ठराविक गडकिल्ल्यांसाठी खर्च करत आहे; परंतु जे किल्ले पुरातत्त्व खात्याकडे आहेत त्या किल्ल्यांसाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्याचे दिसून येत आहे.
इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्लेसंवर्धन फक्त कागदावरच असल्याचे एक उदाहरण असून, गडाच्या तटबंदीची दुरुस्ती करण्याची मागणी गडकरी शंकर धावले व चंद्रकांत भागवत यांनी केली आहे.
पर्यटकांच्या दृष्टीने रोहिडेश्वर ( रोहिडा ) हा ऐतिहासिक किल्ला असून गड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्यामुळे गड पावसाळ्यामध्ये ढासळण्याचे प्रमाण वाढत आहे. पुरातत्त्व खात्याने किल्ले रोहिडेश्वर (रोहिडा) च्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
-सीताबाई गुरव (सरपंच - बाजारवाडी )