बालाजीनगरातील दारूमुक्तीसाठी रणरागिणींचा एल्गार
By admin | Published: January 9, 2016 01:31 AM2016-01-09T01:31:01+5:302016-01-09T01:31:01+5:30
भोसरीजवळच्या बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात एका परवानाधारक देशी दारू दुकानासह बेकायदा दारूविक्रीचे १५ गुत्ते आहेत
पिंपरी : भोसरीजवळच्या बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात एका परवानाधारक देशी दारू दुकानासह बेकायदा दारूविक्रीचे १५ गुत्ते आहेत. झोपडपट्टीत दारूचा महापूर असल्याने व्यसनापायी अनेक कुटुंबे उद््ध्वस्त झाली आहेत. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणूनदेखील दखल घेतली जात नाही. अवैध धंद्यांवर कारवाई होत नाही. बालाजीनगरचा परिसर दारुमुक्त करण्यासाठी एकत्रित आवाज उठविण्यासाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. बेकायदा दारु गुत्त्यावर येऊन कारवाईविना हप्ते घेणा-या पोलिसांना विरोध करण्याचा निर्धार रणरागिनींनी केला आहे.
व्यसनाधीनतेमुळे आजार होऊन अनेक जण दगावले. पतीच्या
जाचाला कंटाळून काही महिलांनी आत्महत्या केल्या. घटस्फोटाने कुटुंबं विभक्त झाली.
व्यसनांच्या आहारी गेलेल्यांनी घरातील साहित्य विकले. मुलांची आबाळ झाली... रोज भांडण, शिवीगाळ हे झोपडपट्टीत नित्याचेच झाले आहे. या अगतिक भावना व्यक्त करून भोसरी, बालाजीनगर परिसरातील दारूधंदे कायमचे बंद करण्यासाठी दारूमुक्ती महिला समितीच्या माध्यमातून १५०० महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. पोलिसांना निवेदन दिले. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती विशद केली आहे. अगोदर सनदशीर व लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्याबद्दल सर्वत्र चर्चा होते. झोपडपट्टीत दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंबं उद््ध्वस्त होतात. त्याकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून झोपडपट्टी परिसरातील बेकायदा दारूधंदे बंद करण्याची आग्रही मागणी महिलांनी केली आहे.
दारूमुक्ती महिला समितीतर्फे सनदशीर मार्ग अवलंबून पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणे निवेदने दिली. शिष्टमंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी घेऊन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. एवढे सर्व करून
काही मार्ग न निघाल्यास दारूबंदी मोहीम अधिक तीव्र करून दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार केला.(प्रतिनिधी)