भक्तिमय स्वरमंचावर अभंगरंगात रसिक चिंब
By admin | Published: July 5, 2017 03:28 AM2017-07-05T03:28:40+5:302017-07-05T03:28:40+5:30
स्वररूपी पांडुरंगाची आस लागलेल्या विठ्ठलभक्तांचा उदंड उत्साह... पं. शौनक अभिषेकी, पं. जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे
पुणे : स्वररूपी पांडुरंगाची आस लागलेल्या विठ्ठलभक्तांचा उदंड उत्साह... पं. शौनक अभिषेकी, पं. जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे या त्रयींच्या मंगलमयी स्वरांनी आसमंतात निर्माण झालेला इंद्रधनू... भक्तिरंगात सजलेला स्वरमंच आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या सुरांनी छेडल्या गेलेल्या रसिकांच्या हृदयाच्या तारा अशा "विठ्ठल"मय वातावरणात भक्त पुंडलिक व्यासपीठावर ‘अभंगरंग’रूपी स्वरमैफिल रंगली.
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने आयोजित यूएसके फाउंडेशन प्रस्तुत आणि कोहिनूर ग्रुप यांच्या सहयोगाने रंगलेल्या "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा" याची शब्दश: प्रचिती देणाऱ्या "अभंगरंग" या सांगीतिक मैफलीने अवघे वातावरण "विठ्ठल"मय झाले. डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करण्यात
आली होती.
"पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय"च्या जयघोषाने अवघा स्वरमंच "भक्ती"मय झाला. पं. शौनक अभिषेकी, पं. जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे या त्रयींनी "जय जय रामकृष्ण हरी"च्या गजराने सांगीतिक मैफलीचा श्रीगणेशा केला.
राहुल देशपांडे यांनी "पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा", "लक्ष्मी वल्लभा" या रचना सादर केल्या. गदिमांच्या "जथा वैष्णवांचा पंढरीस जातो" या काव्यरचनेच्या सादरीकरणातून वारकऱ्यांचे चित्र स्वरांमधून साकारले. टाळ आणि मृदंगाच्या साथीने विठूनामाचा गजर केला. "कानडा राजा पंढरीचा" या अभंगातून भक्तिरसाचा अद्भुत आविष्कार श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. विठ्ठलनामाच्या गजराचा स्वर टिपेला पोहोचला असताना रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली.
निखिल फाटक (तबला), ओंकार दळवी (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), अनय गाडगीळ (सिंथेसायझर) यांनी सुरेख साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे रंगतदार आणि माहितीपूर्ण निवेदन केले.
यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, धीरेंद्र अॅडव्हर्टायझिंगचे धीरेंद्र सेंगर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, मिलन दर्डा यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सहयोगी प्रायोजक केसरी टूर्सच्या माधुरी चौबळ, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे आकाश शेळके, चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक कावरे आइस्क्रीमचे राजू कावरे, काका हलवाई स्वीट सेंटरचे राजेंद्र गाढवे, पंटालून्सचे आल्हाद गोधमगांवकर, स्टेट बँक आॅफ इंडियाचे पाठक, शिवसाई मोटर ट्रेनिंग स्कूलचे विकासकुमार दुग्गल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गायक त्रयींच्या वतीने राहुल देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "शास्त्रीय संगीत ही आपले धरोहर आहे. अभिजात शास्त्रीय संगीत प्रवाही ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. "लोकमत"ने ही धुरा सांभाळत आदर्श निर्माण केला आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही बहुधा एकमेव मैफिल असावी. रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत स्वरमैफिलीत खऱ्या अर्थाने रंग भरले. "लोकमत"ने दरवर्षी विविध ठिकाणी असा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करावा.
ां. शौनक अभिषेकी यांनी अभिषेकीबुवांनी रचलेले "आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी", "संतभार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत" या रचनांमधून भक्तिस्वर आळवले आणि रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. "नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी", "अबीर गुलाल" आदी गाण्यांमधून त्यांनी भक्तिमैफिलीत विशेष रंग भरले. या वेळी निखिल फाटक यांनी तबल्यावर सुरेख ठेका धरत रसिकांची वाहवा मिळवली.
किराणा घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये खुलवत पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" या रचनेतून पांडुरंगाच्या भेटीची उत्कटता सुरांमधून प्रकट केली. स्वरचित "परि विठ्ठल अपरंपार, न कळे अकार, उकार, मकार, करिती विचार, विठ्ठल तरीही अपरंपार" ही रचना सादर करताच रसिकांनी ठेका धरत उत्स्फूर्त दाद दिली. "ठुमक ठुमक पद झिनिक झिनिक" हा अनोख्या धाटणीचा अभंग आणि "माझे माहेर पंढरी" या अभंगानंतर "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" या संत श्री पुरंदरदास यांच्या मेवुंडी यांनी सादर केलेल्या रचनेने स्वरमंदिरावर कळस चढवला. "अगा वैकुंठीच्या राया" या रचनेने तिन्ही गायकांनी मैफिलीची भैरवी केली.
‘अभंगरंग’च्या स्वरमैफलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे विठुरायाच्या भक्तीचे प्रतीक आहे. विठुभक्ती ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तिघाही कलाकारांनी अप्रतिम सादरीकरणाने रसिकांना भक्तिरसाने न्हावू घातले. त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. अभंग गाताना मन आणि भाव एकरूप होते, याची प्रचिती आली.
- उषा काकडे, अध्यक्षा, यूएसके फाउंडेशन
आषाढीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंगरंग’ला मिळालेला हा प्रतिसाद विठ्ठलावर असलेल्या अतूट श्रद्धेचे द्योतक आहे. तीनही गायकांची गायकी ताकदीची आहेच; पण त्यामध्ये विठुनामाचे माहात्म्यही मोठे आहे. भक्तिसंगीताच्या हिंदोळ्यातून रसिकांना भक्तीची अनोखी अनुभूती मिळाली.
- कृष्णकुमार गोयल , अध्यक्ष, कोहिनूर ग्रुप
‘अभंगरंगा’तून तिघाही गायकांनी विठ्ठलभक्तीचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण आसमंत भक्तीच्या रंगात रंगून गेला. आषाढीच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन होणे महत्त्वाचे आहे. ‘लोकमत’सोबत या कार्यक्रमाशी जोडलो गेल्याचे समाधान आहे.
- धीरेंद्र सेंगर,
अध्यक्ष, धीरेंद्र अॅडव्हर्टायझिंग