येरवडा कारागृहाच्या भिंतीलगत सर्रासपणे ' पार्किंग '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 08:27 PM2018-04-24T20:27:41+5:302018-04-24T20:27:41+5:30
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते.
येरवडा : एअरपोर्ट रस्त्यावरील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीलगत 'नो पार्किंग' असतानाही याठिकाणी सर्रासपणे दुचाकी व चारचाकी वाहने लावली जात आहेत. यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका पोहचत असून याकडे वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसते.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भात प्रशासन नेहमीच दक्ष असते. या कारागृहाच्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रशासनाकडून वेळोवेळी विविध उपाययोजना सुचविल्या जातात. अशाच एका अहवालात एअरपोर्ट रस्त्यावरील कारागृहाच्या भिंतीलगत होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे कारागृहाच्या सुरक्षेला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते.
याबाबत मागील सुमारे २ आठवड्यांपूर्वी झालेल्या कारागृह व पोलिस अधिकारी, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत कारागृहाच्या भिंतीलगत 'नो पार्किंग' करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबाबत वाहतूक पोलिसांनी सुरुवातीला वाहनचालकांना माहिती देऊन प्रबोधन केले. त्यानंतर याठिकाणी वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली.
मात्र, वाहतुक पोलिसांची कारवाई ही केवळ फार्सचं ठरली असून याठिकाणी पुन्हा राजरोसपणे वाहने लावली जात असल्याचे दिसते. तसेच कारागृहाच्या भिंतीलगत लावलेल्या 'नो पार्किंग'च्या फलकांची संख्याही अपुरी आहे. येथे आणखी व मोठ्या आकारात फलक लावणे आवश्यक आहे.
...................
आमच्याकडे मुळातच कर्मचारी कमी आहेत, तरीही कारागृहाच्या भिंतीलगत पार्किंग केलेल्या वाहनांवर वारंवार कारवाई केली जाते. याठिकाणी 'नो पार्कींग'चे फलक लावण्याची जबाबदारी महापालिकेची असून आम्ही त्याबाबत पालिकेला पत्रव्यवहार केला आहे. बी. जी. मिसाळ, पोलिस निरीक्षक, येरवडा वाहतुक विभाग