‘राणेंनी वांद्रेंची निवडणूक लढवायलाच नको होती’
By admin | Published: April 19, 2015 01:42 AM2015-04-19T01:42:43+5:302015-04-19T01:42:43+5:30
नारायण राणे यांनी वांद्रे (पूर्व) येथील पोटनिवडणूक लढवायला नको होती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.
पुणे : नारायण राणे यांनी वांद्रे (पूर्व) येथील पोटनिवडणूक लढवायला नको होती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.
पवार म्हणाले, वांद्रेची निवडणूक लढवत असल्याचे राणेंनी मला सांगितले. मी त्यांना विनंती केली की, विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला आहे. शिवाय हा मतदारसंघ नवीन आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवू नका. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढविली. राणेंनी निवडणूक लढवू नये, हे माझे वैयक्तिक मत होते. ती पक्षाची भूमिका नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
‘सोमेश्वर’चा विजय हा सांघिक प्रयत्नांचा विजय आहे. माळेगावचा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे सोमेश्वरची निवडणूक आम्ही गांभीर्याने लढलो. आता विरोधकांनी आरोप न करता पराभव मान्य करावा, असा टोलाही पवार यांनी लगावला. (प्रतिनिधी)