Holi Celebration: 'रंग बरसे भिगे...' होळी, रंगपंचमीनिमित्त बाजारात रंग फुलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 15:08 IST2023-03-05T15:08:17+5:302023-03-05T15:08:58+5:30
जनजागृतीमुळे नागरिकांकडून आता नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालाची मागणी

Holi Celebration: 'रंग बरसे भिगे...' होळी, रंगपंचमीनिमित्त बाजारात रंग फुलला
पुणे : होळी, रंगपंचमी उत्सवाची जय्यत तयारी शहरात सुरू आहे. रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. यानिमित्ताने विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. बाजारपेठा आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, मुखवटे, टोप्या, टिमक्या आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. होळीच्या भोवती वाद्ये वाजवण्याची प्रथा आहे. यासाठी टिमक्या, ताशा वापर केला जातो. बाजारात ४० ते १५० रूपयांपर्यंत ते उपलब्ध आहे. एकूणच होळी आणि रंगपंचमीचा उत्साह बाजारात फुलत आहे.
होळी, रंगपंचमी या सणाला सामाजिक महत्त्व आहे. या दिवशी लोक आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात. एकमेकांना रंग लावून हा उत्सव साजरा केला जातो. लाल रंग प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा रंग लावल्यास वाद मिटतात आणि प्रेम वाढते, अशी भावना आहे.
नैसर्गिक रंगाला मागणी
रंगपंचमीसाठी विविध रंग, गुलालाला मागणी असली तरी जनजागृतीमुळे नागरिक आता नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालाची मागणी करत आहेत. पिचकारी बाजारात १० ते १००० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे. पुंगी, वॉटरबलून १० ते १५० रूपये, केसांचे पंख १५० ते २५० रूपये, टोपी १५ ते १०० रूपये, नैसर्गिक रंग, हर्बल गुलाल, सुगंधित गुलाल, गुलाल स्प्रे, नॅचरल पेंटची बाजारात १५० ते १२०० रूपयांपर्यंतच्या कॅनमध्ये उपलब्ध आहे. यावेळी बाजारात मेड इन इंडिया वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी
पिचकारी, मास्क, पाण्याचा फुगा, केसांचा विग, ओपी, नैसर्गिक रंग, गुलाल आदी वस्तूंची मागणी खूप वाढली आहे. हा सर्व माल दिल्लीतून येतो, मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी असतो. आता होळीच्या सणामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. - सुरेश जैन व्यापारी