साहित्य महामंडळ अन् सरहदमध्ये रंगला कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:32+5:302021-01-09T04:09:32+5:30
शुक्रवारी महामंडळाच्या बैठकीत नाशिकच्या निमंत्रणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचवेळी संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. ...
शुक्रवारी महामंडळाच्या बैठकीत नाशिकच्या निमंत्रणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचवेळी संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीचा आदर करुन दिल्लीकरांची तयारी असल्यास एक ‘विशेष’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करेल, असे संजय नहार यांना सुचवण्यात आले होते. हे संमेलन १ मेला घेण्याची तयारी दर्शवण्यात आली. मात्र, नहार यांनी महामंडळाचा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष संमेलनाची संधी हुकली, असे महामंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत नहार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास स्वागताध्यक्ष करुन दिल्लीत संमेलन घेण्याचा प्रस्ताव आम्ही ठाले-पाटील यांच्यापुढे ठेवला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत एकही संमेलन झालेले नाही. त्यामुळे सरहदतर्फे पुढाकार घेण्यात आला होता. मात्र, अध्यक्षांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. संमेलन दिल्लीला की नाशिकला हा वाद कधीच नव्हता, तर दिल्लीबाबत घेतल्या जाणा-या हरकतींबाबत होता. नाशिकमध्येही साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडेल, अशी खात्री वाटते.’
------------
महामंडळाच्या घटनेमध्ये विशेष संमेलन घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार सरहदला विशेष संमेलनाचा प्रस्ताव देण्यात आला होता. यापूर्वी अंदमानलाही विशेष संमेलन झाले होते. संमेलनासाठी अनेक संस्था प्रयत्न करत असतात. मात्र, सार्वजनिक संस्थामध्ये काम करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते.
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
----------------------
सरहद संस्थेने यापूर्वी घुमानचे संमेलन यशस्वीरित्या पार पाडले. मात्र, नाशिकलाच संमेलन घ्यायचे हे आधीच ठरल्याप्रमाणे सर्व हालचाली झाल्या. आमच्या सरळ, स्पष्ट आणि सदहेतूबद्दल शंका घेण्याचा प्रकार नक्कीच ‘कौतुकास्पद’ नाही.
- संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था