खड्ड्यांमध्ये रंगला विटीदांडू आणि गोट्यांचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:31+5:302021-07-29T04:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत विटीदांडू आणि गोट्या खेळत काँग्रेसच्या शहर शाखेने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत विटीदांडू आणि गोट्या खेळत काँग्रेसच्या शहर शाखेने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. भ्रष्टाचारामुळेच कामे निकृष्ट होऊन थोड्याशा पावसात भाजपाचे पितळ उघडे पडले, अशी टीका या वेळी करण्यात आली.
टिळक स्मारक चौकात बुधवारी दुपारी हे आंदोलन झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड, प्रदेश सचिव व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संजय बालगुडे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बागवे म्हणाले, काँग्रेसने सत्तेचा वापर सामान्यांचे जगणे सुधारावे म्हणून केला. पुण्यातील आत्ता दिसत आहेत ती काँग्रेसने केलेल्या विकासाची उदाहरणे आहेत. यांच्या महापालिकेतील सत्ताकाळात फक्त ठेकेदारांचीच चलती आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी यांनी एकही काम सोडलेले नाही.
संयोजक बालगुडे यांनीही भाजपावर टीका केली. शहराचे शिल्पकार म्हणवून घेताना देवेंद्र फडणवीस यांना काहीच कसे वाटत नाही. विकासकाम केल्याचे एकतरी उदाहरण त्यांनी दाखवावे. आम्ही चंद्रकांत पाटील यांंना लवकरच एक मोठा चष्मा भेट देणार आहोत. त्यात पाहून तरी त्यांना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहर कसे भकास केले ते दिसेल.
ऋषीकेश बालगुडे, नीता राजपूत, बाळासाहेब दाभेकर, प्रकाश पवार, सचिन आडेकर, बबलू कोळी, संदीप आतपळकर, प्रणव नामेकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून विटी दांडू व गोट्यांचा एक एक डाव रंगवला. भाजपाच्या विरोधातील घोषणा देण्यात आल्या.
मलमपट्टीतही भ्रष्टाचार
“रस्त्यावरचे खड्डे बुजवताना ते आतील बाजूने जास्त खोदून नंतरच त्यामध्ये डांबर असलेली खडी भरून खड्डा बुजवतात. ही शास्त्रीय पद्धत आहे. त्याशिवाय आता अत्याधुनिक मिश्रण मिसळतात, त्यामुळे पाऊस असतानाही खड्डा बुजवता येतो. असे काहीही न करता सध्या फक्त डांबरी खडी पसरवून जुजबी काम केले जात आहे. ही मलमपट्टीही भ्रष्टाचारातूनच होते आहे.”
संजय बालगुडे- प्रदेश सचिव, काँग्रेस