शिवशाहिरांच्या शतकपूर्तीचा प्रारंभ रंगावली-दीपवंदनेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:20+5:302021-07-29T04:11:20+5:30
प्रा. अक्षय शहापूरकर आणि श्रीरंग कलादर्पणच्या ७ कलाकारांनी २७ तासांत २० बाय १५ फूट रंगावली साकारली. रंगावलीमध्ये बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र, ...
प्रा. अक्षय शहापूरकर आणि श्रीरंग कलादर्पणच्या ७ कलाकारांनी २७ तासांत २० बाय १५ फूट रंगावली साकारली. रंगावलीमध्ये बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र, त्यांचे शिवचरित्र प्रसाराचे पैलू दर्शवण्यात आले आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळातर्फे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रारंभ शतकपूर्तीचा’ हा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन सदाशिव पेठेतील पेरुगेट भावे स्कूल प्रशालेत करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, दादरानगर हवेली मुक्ती संग्रामातील बाबासाहेबांचे सहकारी वसंत प्रसादे, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑनलाईन पद्धतीने यावेळी सहभाग घेतला.
भूषण गोखले म्हणाले, “इतिहासातून काय शिकायचे हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहासातून मिळणाऱ्या धडयांतून भारताला कसे अधिकाधिक सक्षम करता येईल, याचा विचार आपण करायला हवा. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे चालता-बोलता इतिहास आहे. त्यांच्या माध्यमातून स्वराज्य आणि सुराज्य याच्या अनेक गोष्टी याच इतिहासातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत.”
मोहन शेटे यांनी सांगितले, की बाबासाहेबांचे शालेय शिक्षण पेरुगेट भावे स्कूल येथे झाले होते. त्यामुळे येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्याला नमन देण्यासोबतच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. ३० जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे. वसंतराव प्रसादे यांनी दादरानगर हवेली मुक्ती संग्रामातील व बाबासाहेबांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
-----------------------------
मी आनंदी; समाधानी नाही : पुरंदरे
महत्त्वाकांक्षी व हौशी माणूस कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. वयाच्या ९९ वर्षांपर्यंत परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करीत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखन करून स्वत: काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, त्यामुळे वयाच्या ९९ वर्षांत मी आनंदी आहे, पण समाधानी व तृप्त नाही. मला भारतातच पुनजन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे, अशी भावना पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑनलाईन माध्यमातून व्यक्त केली.