‘तन्वीर सन्माना’त रंगकर्मींची मांदियाळी
By Admin | Published: December 10, 2015 01:34 AM2015-12-10T01:34:05+5:302015-12-10T01:34:05+5:30
नाट्य, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी, अॅलेक पदमसी यांनी ‘द मर्चंट आॅफ व्हेनिस’मधील शायलॉकच्या भूमिकेतील सादर केलेला प्रवेश, सहकारी रंगकर्मींनी
पुणे : नाट्य, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी, अॅलेक पदमसी यांनी ‘द मर्चंट आॅफ व्हेनिस’मधील शायलॉकच्या भूमिकेतील सादर केलेला प्रवेश, सहकारी रंगकर्मींनी पुरस्कारार्थींचा उलगडलेला मनोगतातून जीवनपट आणि ‘जिजस क्रायसेस-२’मधील चित्रफितीद्वारे दाखविण्यात आलेला रोमांचक प्रसंग अशा वातावरणात तन्वीर सोहळा बुधवारी सायंकाळी रंगला.
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे या वर्षीचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाट्यकर्मी अॅलेक पदमसी यांना, तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार कलादिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांना ज्येष्ठ अभिनेते आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते देण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा झाला. अभिनेते, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, फारुक मेहता, दीपा लागू व्यासपीठावर होते. मान्यवरांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता, नाटककार सतीश आळेकर, महेश मांजरेकर, अमोल पालेकर, अतुल पेठे, ज्योती सुभाष आदींची उपस्थिती होती.
फारुक मेहता यांनी अॅलेक पदमसी यांचा नाट्यसृष्टीतील जीवनपट उलगडून दाखविला. वयाच्या सातव्या वर्षी ‘मर्चंट आॅफ व्हेनिस’ या नाटकातील ब्लॅकमूनपासून सुरुवात केली. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात ‘टेमिंग आॅफ द श्रू’पासून सुरुवात करून ‘शायद आप भी हॅँसे’ या नाटकापासून हिंदी नाट्यसृष्टीत प्रवास सुरू केला. पर्ल पदमसी, कबीर बेदी, सबीरा मर्चंट, शॅरॉन प्रभाकर, दुलिप ताहिल यांसारख्या कलाकारांची तारेतारका होण्याकडे वाटचाल अॅलेक यांच्या नाटकापासून सुरू झाली. त्यांच्या दिग्दर्शनाखाली स्मिता पाटीलने रंगमंचावर पाऊल ठेवले. शेक्सपिअर, आॅर्थर मिलर, टेनेसी विल्यम्स अशा प्रमुख विदेशी कलाकारांसह प्रताप शर्मा, रिफत शमीम, इस्मत चुगताई, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड अशा भारतीय लेखकांची नाटके त्यांनी इंग्रजी, हिंदी व हिंगलीशमध्ये रंगमंचावर आणली.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्य, कलाक्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला. मुळ्ये यांनी त्यांच्या कारकिर्दीत नेपथ्य आणि प्रकाशयोजनेतील कामगिरीमुळे दृष्यमानतेचे नवे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. प्रयोगशील आणि व्यावसायिक अशा दोन्ही तत्त्वांवर उत्तमच काम करणारा हा कलाकार आविष्कारच्या माध्यमातून प्रयोगशील दिग्दर्शक म्हणूनही भावला आहे.
प्रतिष्ठानविषयी आनंद लागू यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)