बारामती शहरात रंगला शिवजन्मोत्सव
By admin | Published: February 20, 2017 02:25 AM2017-02-20T02:25:11+5:302017-02-20T02:25:11+5:30
शहरात छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा केला. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये युवकांनी सायंकाळी
बारामती : शहरात छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा केला. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये युवकांनी सायंकाळी शहरातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची रॅली काढली. या रॅलीमध्ये पारंपरिक पद्धतीने भगवे फेटे परिधान केलेल्या युवक-युवतींनी सहभाग घेतला.
बारामती शिवजयंती महोत्सव समिती आणि बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक जयसिंग देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक भराटे, बाळासाहेब जाधव, समीर चव्हाण, नाना सातव, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक सुधीर पानसरे उपस्थित होते.
याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच, महात्मा फुले, शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. जयंतीनिमित्त संपूर्ण बारामती शहर हे शिवमय झाले होते. सायंकाळी शहरातून श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याची सजविलेल्या वाहनामध्ये रॅली काढली. रॅलीमध्ये पारंपरिक पद्धतीने भगवे फेटे परिधान केलेल्या युवती, युवक दुचाकीवर सहभागी झाले होते. जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणा शहरात दुमदुमल्या. जयंतीनिमित्त्य व्याख्यान व वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे समितीने सांगितले. मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष विकास खोत, तालुकाध्यक्ष प्रा. गोविंद वाघ, सचिन घाटगे, मुकेश घाटगे, सतीश भगत, महेंद्र गायकवाड व विविध संघटना सहभागी होत्या. आभार वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे महासचिव प्रकाश टेमगर यांनी नियोजन केले.
दरम्यान, बारामती तालुका मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सेवा संघाच्या वतीने जिजाऊ भवन येथे जयंतीनिमित्त शिवप्रतिमेचे नगराध्यक्षा तावरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन केले. या वेळी जिजाऊ सेवा संघाच्या वतीने महिलांनी पारंपरिक पध्दतीने पाळणागीत गायन करुन शिवजन्मोत्सव साजरा केला. रांगोळी काढून, भगवे ध्वज लावून या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, अशी माहिती सेवा संघाचे प्रदीप शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)