कविसंमेलनात रंगली जुगलबंदी
By Admin | Published: May 30, 2017 02:25 AM2017-05-30T02:25:57+5:302017-05-30T02:25:57+5:30
येथे पार पडलेल्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित अहिराणी काव्य संमेलनात विविध प्रकारच्या कविता
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : येथे पार पडलेल्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित अहिराणी काव्य संमेलनात विविध प्रकारच्या कविता मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
अंकुशराव लांगडे नाट्यगृहात झालेल्या संमेलनातील काव्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी भूषवले. या वेळी कवी एम. के. भामरे यांनी ‘गाजाडा गाजाडा अहिराणी, बोल तुम्ही गाजाडा गाजाडा’ , कवी अजय बिरारी यांनी ‘गण्या आणि मन्या धारुल पनणार’ ही मैत्रीकविता, शरद धनगर यांनी शेतकारी आत्महत्यांवर फास, ज्येष्ठ कवी रघुनाथ पाटील यांनी ‘दारू पिऊ नको भाऊ’, राजेंद्र जाधव यांनी ‘मले नवरदेव घनावडा’ जितू बहारे यांनी ‘जशी दूध पाजे लेंकरुले, लेंकरूंनी माय’, अनुराधा धोंडगे यांनी ‘अहिराणी माय’ ही कविता सादर केली.
अहिराणी अहिराणी,
खान्देशनी भाषा अहिराणी,
अहिराणी अहिराणी,
लोकास्नी भाषा अहिराणी
सादी-सुदी अन् ऐकाले गोड
झटक्याले तिन्हा नही शे तोड
गाया बी तीन लागतस गोड
बठ्ठया भाषास्मा लागे ती गोड
खान्देशना ताईसाठी गहू दयेश,
बाजरी दयेश दयता दयता मायं
दएन दयता याद माहेरनी ऐस
याद माहेरनी ऐस
गहू दयेश बाजरी दयेश....
अशा रचना सादर करण्यात आल्या. अहिराणी कविसंमेलना सोबतच बहुभाषिक कविसंमेलनही या वेळी आयोजन करण्यात आले होते. कविंचा सत्कार संयोजिका विजया मानमोडे यांच्याहस्ते करण्यात आला.
शेतकऱ्यांची दु:खे : इतिहासावर कथा
कथाकथन सादरीकरणास उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात मनमुराद दाद दिली. ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. योगिता पाटील, सुनील गायकवाड, विलास मोरे या कथाकारांनी यात सहभाग घेतला. शेतकरी बांधवांची दु:खे व त्यांच्या अडचणी, मुलींच्या जन्माचे स्वागत करा, अहिराणीचा प्राचीन इतिहास, देशाच्या जडणघडणीसाठी अहिराणीचा मोलाचा वाटा अशा विषयावर कथाकारांनी कथा सादर केल्या. अहिराणी बोलायला, ऐकायला गोड अशी भाषा आहे.अहिराणी भाषा खान्देशातील प्रमुख भाषा आहे. अहिराणी खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. अहिराणी आता काही खान्देशवासींना आवडत नाही. म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत डॉ. योगिता पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. जशी दहिमान लोणी, सगळा पारखी ताकना, इले पारखं नही कोणी.. असेच मत या वेळी आयोजित कथाकथनातून मान्यवरांनी उपस्थित केले.
पोऱ्या ते पोऱ्या...
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंंच पुणे यांच्या वतीने पाचव्या एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी संमंनेलनाची सांगता धम्माल अहिराणी विनोदी नाटक ‘पोऱ्या ते पोऱ्या, बाप रे बाप’ ने झाली. बापूसाहेब पिंगळे, प्रवीण माळी आणि वनमाला बागुल यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या विनोदी नाटकामुळे उपस्थित प्रेक्षकांत हास्यकल्लोळ झाला होता.