मतदार राजासाठी रांगोळीच्या पायघड्या
By admin | Published: February 22, 2017 02:27 AM2017-02-22T02:27:41+5:302017-02-22T02:27:41+5:30
दारासमोर रांगोळी... दारावर केळीचे खुंट... कानावर सुमधुर सनईचे सूर... मंद सुगंधाचा दरवळ... फुलांनी होणारे
बारामती : दारासमोर रांगोळी... दारावर केळीचे खुंट... कानावर सुमधुर सनईचे सूर... मंद सुगंधाचा दरवळ... फुलांनी होणारे स्वागत... गुलाबी रंगाच्या पताका...फुगे... गुलाबी रंगाच्या पोशाखातील हसतमुख कर्मचारी... एखाद्या लग्नघरात शोभेल अशा वातावरणात आज सुपे आणि काटेवाडीच्या मतदान केंद्रांवर करण्यात आले होते. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदान केले. आदर्श मतदान केंद्र साकारताना प्रशासनाने केलेल्या अनोख्या उपक्रमामुळे मतदार अक्षरश: भारावून गेले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यात २० आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधील सुपे मतदान केंद्र ‘पोपटी’, तर काटेवाडी मतदान केंद्र ‘गुलाबी’ रंगाच्या थीमनुसार मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी विशेष रंगसंगतीने सजविण्यात आले होते.
18 आदर्श केंद्रे...
सुपे आणि काटेवाडी या दोन्ही मतदान केंद्रांसह तालुक्यातील इतर १८ मतदार केंद्रेही ‘आदर्श मतदार केंद्र’ म्हणून स्थापित करण्यात आली होती. या मतदान केंद्रांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात आला होता. सुपे आणि काटेवाडी मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र करण्याचे नियोजन चर्चेचा विषय ठरला. मतदारांना आकर्षित करण्याचा हा वेगळा प्रयोग ठरला.
केंद्रावर आल्हाददायक वातावरण
या दोन्ही मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षासह मतदान केंद्र अधिकारी १ ते ४ महिलाच होत्या. तसेच, मदतनीस शिपाई व पोलीसही महिलाच होत्या. महिला पोलीस वगळता सर्व कर्मचारी केंद्राने निवडलेल्या रंगसंगतीचा पोशाख परिधान केलेल्या होत्या. तसेच, मतदान केंद्रांसाठी निवडलेल्या रंगाच्या पताका, फुगे लावण्यात आले होते. त्याचबरोबर या दोन्ही मतदान केंद्रांच्या आवारात मधुर संगीताची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदी सुविधा होत्या.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रोपटे...
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या वेगळ्या उपक्रमासाठी प्रेरित केले होते. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी आलेल्या पहिल्या पाच मतदारांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले. या मतदान केंद्राला मुख्य निवडणूक निरीक्षक अरुण डोंगरे यांनीही भेट दिली.