पुण्यातील रांजणखळग्यांनी घेतला मोकळा श्वास...!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:29 PM2023-01-09T12:29:50+5:302023-01-09T12:30:02+5:30
नदीमध्ये खडकाळ भागात पाण्यामुळे तयार झालेले रांजणखळगे कचऱ्याने भरून गेले होते
श्रीकिशन काळे
पुणे : नैसर्गिक पद्धतीने नदीमध्ये खडकाळ भागात पाण्यामुळे रांजणखळगे तयार होतात. चक्क पुण्यात मुठा नदीत नांदेड सिटीच्या मागील बाजूस पुलावर असे रांजणखळग्यांचे प्राथमिक स्वरूप पाहायला मिळत आहेत. मात्र, जनजागृतीअभावी नागरिक त्यात कचरा टाकत हाेते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच सामाजिक संस्था आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तेथील कचरा काढला आहे. तसेच त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
जगप्रसिद्ध रांजणखळगे बघण्यासाठी नागरिकांना पुणे जिल्ह्यातील निघोज येथे येतात. पुण्यातील नागरिक माेठ्या संख्येने तेथे जातात. आता शहरातच शिवणे व नांदेड सिटीच्या मागील मुठा नदीत रांजणखळगे दिसत आहेत. त्याची माहिती लोकांना नसल्याने सर्व खळगे कचऱ्याने भरून गेले होते. तेथील पुलाला संरक्षक कठडेही नसल्याने थेट नदीपात्रात कचरा फेकला जात हाेता. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट, महाएनजीओ फेडरेशनचे मुकुंद शिंदे, नांदेड सिटीचे ॲड. नरसिंग संभाजीराव लगड आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी येथील स्वच्छता केली आहे. जवळपास तीन ट्रक कचरा काढला. काही कचरा खोल असल्याने जेसीबी लावून काढला.
माहिती फलक लावणार
रांजणखळगे कचरामुक्त करण्यासाठी टेल्स ऑर्गनायझेशन आणि महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या आशा राऊत यांना पत्र दिले होते. त्यानंतर पालिकेच्या वतीने वीस कर्मचारी आणि सर्व साहित्य पुरविण्यात आले. त्या ठिकाणी पुन्हा कचरा होऊ नये म्हणून पुलाला संरक्षक जाळी लावण्यात येईल. रांजणखळग्यांविषयीचा माहितीफलकही लावण्यात येईल. जेणेकरून लोकांना त्या ऐतिहासिक ठिकाणाविषयी माहिती होईल.
''अतिशय सुंदर असे ठिकाण पुणे शहरात आहे आणि त्याची माहितीच कोणाला नाही, हे दुर्दैवी आहे. त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही इथे स्वच्छता केली. - लोकेश बापट, संस्थापक, टेल्स ऑर्गनायझेशन''