रानमळा पॅटर्न देशभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:53+5:302021-06-25T04:09:53+5:30
कडूस : रानमळा पॅटर्नची केंद्र शासनाने दखल घेतली आहे. रानमळा पॅटर्नच्या दोन्ही जीआरचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर केले असून ...
कडूस : रानमळा पॅटर्नची केंद्र शासनाने दखल घेतली आहे. रानमळा पॅटर्नच्या दोन्ही जीआरचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर केले असून आता भारत देशातील सर्व राज्यात 'रानमळा पॅटर्न ' पोहोचलाय. रानमळा ग्रामस्थांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणारे काम केले आहे. वृक्षसंवर्धनाच्या कामामध्ये कल्पकतेला भावनिक रूप देऊन १९९६ पासून रानमळा ग्रामस्थांनी कामात सातत्य ठेवले आहे. त्यामुळे वृक्षासंवर्धनाचे हॆ आगळे वेगळे काम उभे राहिले आणि रानमळा हॆ छोटेसे गाव राज्य पातळीवरून देश पातळीवर गेले. असे प्रतिपादन सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव यांनी केले.
वृक्षसंवर्धनाचा आगळा वेगळा पॅटर्न राबाविणाऱ्या रानमळा (ता. खेड ) गावाला आज राव यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
दिल्ली येथे केंद्र शासनाच्या सेवेत असताना त्यांनी 'रानमळा पॅटर्न बद्दलची माहिती घेतील होती. महाराष्ट्रात नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आज ‘रानमळा पॅटर्न 'ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक किशोर पोळ, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पी. टी. शिंदे उपस्थित होते.
यावेळी रंगनाथ नाईकडे म्हणाले की, रानमळा ग्रामस्थांनी देशाला मार्गदर्शक ठरणारे काम केले आहे. रानमळा या नावाला शोभेल असे काम अर्थात गावाप्रमाणे असे अनेक रानमळे तयार झाले पाहिजेत. कोरोना महामारीमुळे लोकांना ऑक्सिजनचे म्हणजेच वृक्षाचे महत्त्व खूपच पटले आहे. रानमळा ग्रामस्थांनी खूप मोलाचे काम केले.
यावेळी तनुजा शेलार, वनपाल दत्ता फापाळे, गुलाब मुके, वनरक्षक शिवाजी राठोड, जी. रं. शिंदे, बाबाजी शिंदे, मुख्याध्यापिका सुनंदा ढमाले, प्रिया देवरे, कविता बनकर उपस्थित होते. जि. रं. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बाबाजी शिंदे यांनी आभार मानले.
--
झाडांचा रौप्य महोत्सवी वाढदिवस
रानमळा पॅटर्नच्या कामाला १९९६ साली सुरुवात झाली. गावातील काही शोषखड्ड्यात महिलांनी २५ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले होते. त्या रौप्यामहोत्सवी झाडांचा वाढदिवसही यावेळी औक्षण करून साजरा करण्यात आला. रानमळा पॅटर्नच्या उपक्रमानुसार पाहुण्यांच्या हस्ते अतिथी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ. राव, यादव,यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.