महिला डॉक्टरला बदनामीची धमकी देत २० लाखांच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:55 PM2018-03-29T15:55:04+5:302018-03-29T15:55:04+5:30
शहरातील नामांकित महिला डॉक्टराला मिटिंगमध्ये धक्काबुक्की करुन बदनामी करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देशातील नामांकित डॉक्टरांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़.
पुणे : शहरातील नामांकित महिला डॉक्टराला मिटिंगमध्ये धक्काबुक्की करुन बदनामी करण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देशातील नामांकित डॉक्टरांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़. खंडणी मागणाऱ्यांमध्ये पुणे, दिल्ली, मुंबई आणि हैद्राबाद येथील डॉक्टरांचा समावेश आहे़.
डॉ. प्रदिप चौबे (वय ६५, रा़ दिल्ली), डॉ. सुरेंद्र उगले (वय ६०, रा़ हैद्राबाद), डॉ. राजेश खुल्लर (वय ५८, रा़ दिल्ली), डॉ. अतुल पिटर (वय ५०, रा़ दिल्ली), डॉ. मुफजल लकडावाला (वय ४७, रा़ मुंबई) आणि श्रीहरी ढोरेपाटील (वय ६५, रा पुणे) यांच्याविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़.
याप्रकरणी पुण्यातील ४७ वर्षांच्या नामांकित महिला डॉक्टरने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जानेवारी ते २२ मार्च २०१८ दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रदिप चौबे, डॉ. सुरेंद्र उगले, डॉ. राजेश खुल्लर, डॉ. अतुल पिटर आणि श्रीहरी ढोरेपाटील यांनी मिटींगमध्ये महिला डॉक्टरांची बदनामी करुन त्यांना धक्काबुक्की केली़. डॉ़. लकडावाला यांनी महिला डॉक्टरला २० लाख रुपये दे नाही तर तुझी बदनामी चालू ठेवू अशी धमकी दिली़. तसेच डॉ़ ढोरेपाटील यांनी मनास लज्जा उत्पन्न होईल अशी बोलले़.
डॉ. चौबे हे दिल्ली येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत असुन ते लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. डॉ. उगले हे हैद्राबाद येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत़. डॉ. खुल्लर हे देखील एमए जनरल सर्जन आहेत. डॉ. पीटर हे डीएनबी तर डॉ. लकडावाला एमएस जनरल सर्जन तसेच बॅरॅट्रीक सर्जन आहेत. गुन्हा दाखल झालेले पाचही डॉक्टर देशातील नामांकित डॉक्टर आहेत. श्रीहरी ढोरेपाटील हे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत़. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते अधिक तपास करीत आहेत़.