बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करुन मागितली २ लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 01:10 PM2021-01-28T13:10:55+5:302021-01-28T13:14:28+5:30
या तिघा अपहरण करणार्यांनी ऑफिस बॉयला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते.
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणार्या ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करुन त्याला सोडून देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार गण्या व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या ऑफिस बॉय म्हणून काम करणार्या मुलाने गुन्हेगारांचे भांडण सुरु असताना रात्री स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. त्याला येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ठेवले होते.
याप्रकरणी साईकमार शिवमुर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वारजे येथील कार्यालय आहे. १८ वर्षाचा धिरज ऑफिस बॉय म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी तो शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथे आला असताना गण्या व त्याच्या दोन साथीदाराने धिरज याला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व येरवडा येथे जायचे असल्याचे सांगून त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी जावळकोटी यांना वेगवेगळ्या चार मोबाईलवरुन फोन करुन धिरजला सोडून देण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. जावळकोटी यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. पोलिसांनी धिरज याचा शोध सुरु केला. तेव्हा त्याला रिक्षातून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. धिरज याचा शोध सुरु असतानाच त्याने स्वत: या मुलांच्या तावडीतून सुटका करुन घेतली.
या तिघा अपहरण करणार्यांनी ऑफिस बॉयला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते. तेथूनच त्यांनी जावळकोटी यांना फोन करुन खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलाचाली सुरु असताना अचानक तिघे भांडू लागले. ही संधी साधून धिरज याने त्यांना धक्का देऊन त्यांना काही समजायच्या आत तेथून पळून आला. वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.