कंपनी बंद पाडण्याची धमकी देऊन मागीतली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:15+5:302021-02-26T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : घरबांधणीसाठी दिलेले तीन लाख रुपये परत मागितल्यावरून माथाडी कामगार आणून कंपनी बंद पाडू अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : घरबांधणीसाठी दिलेले तीन लाख रुपये परत मागितल्यावरून माथाडी कामगार आणून कंपनी बंद पाडू अशी धमकी देऊन, पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला म्हाळुंगे पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी एका पत्रकारासह त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वसाथीदार फरार आहेत.
रामकृष्ण माधव रेड्डी यांनी म्हाळुंगे पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार प्रवीण रूपराव ठाकरे (वय ३८, रा. मंत्रा रेसिडेन्सी, निघोजे, ता. खेड), पत्रकार कांबळे (नाव-पत्ता कळू शकला नाही), राजे प्रतिष्ठानचे सूरज पोतदार, गणेश (नाव-पत्ता कळू शकला नाही), त्यांचे अन्य दोन साथीदार (नाव-पत्ता नाही) यांच्यावर म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रवीण ठाकरे याला जेरबंद करण्यात आले आहे. इतर सर्व आरोपी फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
रामकृष्ण रेड्डी आणि प्रवीण ठाकरे हे दोघे जण रामा इंडस्ट्रीज (निघोजे, ता. खेड) येथील कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीतील कामगार प्रवीण ठाकरे याने घरबांधणी करिता रेड्डी यांच्या कडून तीन लाख रुपये हात उसने घेतले होते. त्याबदल्यात तारण म्हणून चेक दिला होता. काही दिवसांनंतर पैसे परत मागितले असता, प्रवीण ठाकरे याने पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्याने दिलेला चेक बँकेत भरला असता तो बाऊन्स झाल्याने रामकृष्ण रेड्डी यांनी प्रवीण ठाकरेच्या विरोधात केस दाखल केली.
न्यायालयात केस दाखल केल्याचा राग मनात धरून ठाकरे याने पत्रकार कांबळे, राजे प्रतिष्ठानचे सूरज पोतदार, गणेश व त्यांचे अन्य दोन साथीदार यांनी अनधिकृतपणे कंपनीत प्रवेश करून व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. व्यवस्थापक प्रिया भोसले यांच्याकडे कंपनीच्या कामकाजाची माहिती विचारून त्यांना शिवीगाळ केली. हा वाद मिटवण्यासाठी रामकृष्ण रेड्डी यांच्या वतीने ठेकेदार चौहान याने पत्रकार कांबळे याला फोन केला असता, प्रवीण ठाकरे याला दिलेले तीन लाख रुपये परत मागायचे नाहीत, तसेच पाच लाख रुपये त्याला अधिक द्यायचे नाही तर कंपनीत माथाडी कामगार कंपनीत आणून कंपनीचे नुकसान करू,कंपनी बंद पाडू अशी धमकी दिली.